Breaking News! 1 एप्रिलपासून रजेसाठी ऑफलाईन अर्ज चालणार नाही :, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावा लागेल ऑनलाईन अर्ज
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १ एप्रिलपासून रजा घ्यायची असल्यास त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. यामुळे प्रचलित ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया कालबाह्य होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील आदेश आज (गुरुवारी) काढले आहेत.
राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सेवा पुस्तकविषयक बाबीसंदर्भात 'ई-एचआरएमएस' (ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणाली विकसित करण्यात आली असून त्याअंतर्गत सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची डिजिटल सेवापुस्तके तयार करण्यात येत आहेत. तसेच सर्व प्रशासकीय विभागांच्या नियंत्रणाखालील अधिनस्थ कार्यालयांचा (उदा. आयुक्तालय, संचालनालय इ.) समावेश या नवीन प्रणालीत करण्यात येत आहे. या प्रणालीवर सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तकविषयक माहिती भरण्याबाबत सर्व संबंधित विभागांना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने ३ मार्च २०२३ च्या परिपत्रकानुसार सूचना देण्यात आल्या आहेत. या नवीन प्रणालीमध्ये सुटी (leave) या पर्यायात रजेचे ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. बऱ्याच विभागांमध्ये ऑनलाइन अर्ज करण्याचे प्रमाण फारच कमी असल्याचे आढळून आले आहे.
आता ही नवीन प्रणाली यशस्वीरीत्या कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक विभागातील सर्वच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रजेचे अर्ज ऑनलाइन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व मंत्रालयीन विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येकांनी त्यांच्याअंतर्गत असलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी (खुद्द आणि क्षेत्रीय) यांना १ एप्रिलपासून त्यांच्या सर्व रजेचे अर्ज या नवीन प्रणालीमार्फतच करण्याच्या सूचना द्याव्यात, असेही सामान्य प्रशासन विभागाच्या या आदेशात नमूद आहे.
रजेचा ऑफलाइन अर्ज चालणार नाही
सर्व विभागांनी त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे रजा लेखे अद्ययावत ठेवावेत. कोणतेही रजेचे अर्ज ऑफलाइन घेण्यात येऊ नयेत, अशा सूचना राज्यातील सर्व शासकीय विभागांना सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिव रोशनी दिनेश कदम- पाटील यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. त्यामुळे आता शासकीय कर्मचाऱ्यांना यापुढे रजेचा अर्ज ऑनलाइनच करावा लागणार आहे. यामुळे कोणता अधिकारी, कर्मचारी रजेवर आहे, हे एका क्लिकवर समजण्यास मदत होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.