असीम सरोदेंचा गंभीर दावा; गुवाहाटीत एअर हॉस्टेसचा विनयभंग कुणी केला? दारूच्या नशेत...
धाराशिव: दारुच्या नशेत झिंगत असलेले नेते आज जरी सत्तेत बसले असले तरी हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही. या २ प्रश्नांचा मागोवा घेतल्यास आज ज्या खुर्चीवर ते बसलेत त्या खुर्च्या हलल्याशिवाय राहणार नाही असं सांगत अँड असीम सरोदे यांनी गुवाहाटीला गेलेल्या आमदारांवर लैंगिक अत्याचाराचा गंभीर आरोप लावला.
धाराशिव इथं निर्भय बनो या मेळाव्याला संबोधित करताना असीम सरोदे म्हणाले की, गुवाहाटीत ज्याठिकाणी ते थांबले होते. तिथे कुठल्याही इतर ग्राहकांना जाण्याची परवानगी नव्हती. परंतु स्पाईस जेट, इंडिगो या कंपन्यांनी हॉटेलमध्ये आधी रुम्स बुक केल्या होत्या. या कंपन्याचे हॉटेलसोबत वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होते. जिथे वरच्या मजल्यावर काही एअर हॉस्टेस राहत होत्या. त्या हॉटेलच्या लिफ्टमध्ये एअर हॉस्टेसच्या छातीवर हात कुणी नेले, एअर हॉस्टेसचा विनयभंग आणि लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला हे महाराष्ट्राने शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यांचे खरे चारित्र्य आपल्यासमोर येईल असा दावा त्यांनी केला.
तसेच एकनाथ शिंदे काही आमदारांना घेऊन गुवाहाटीला पळून गेले. गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये १ आमदार पळून गेले. ८ किमीवर गेल्यावर त्यांना पकडून आणण्यात आले. त्या आमदाराला गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. तसेच आणखी एका आमदाराला मारहाण झाली, त्या २ आमदारांना कुणी मारहाण केली हा प्रश्न पत्रकारांसाठी आहे. त्यांनी शोधावे असंही असीम सरोदेंनी म्हटलं.
दरम्यान, भाजपानं महाराष्ट्रासह देशभरात घोडेबाजार सुरू केलाय. अब की बार ४०० पार ही घोषणा जरी भाजपानं दिली असली तरी ते आतून घाबरलेले आहेत. भाजपा सरकार येऊ शकणार नाही हे त्यांना माहिती झालंय. बिहार, कर्नाटक, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र याठिकाणी भाजपाचं लक्ष आहे. कारण या चारही राज्यात इथले प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत. त्यामुळे काँग्रेससह प्रादेशिक पक्ष मजबूत आहेत अशा ठिकाणी त्यांनी प्रादेशिक पक्ष फोडण्यावर भर दिला. महाराष्ट्रात सर्वात मजबूत असलेली शिवसेना पहिली फोडली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. जशा जशा निवडणूक जवळ येतील अनेक राजकीय पक्ष फोडले जातील असा आरोप सरोदेंनी केला.
ईडीचा निर्दयीपणे गैरवापर
ईडीचा वापर निर्दयीपणे केलेला आहे. सीबीआयच्या ९५ टक्के केसेस विरोधी पक्षाच्या नेत्यावर झाले आहेत. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप झाला. जेलमध्ये ठेवले. कोर्टात सिद्ध झाले नाही शेवटी अनिल देशमुखांना जामीन मिळाला. संजय राऊतांवर अशाचप्रकारे केसेस टाकल्या. त्यांना जेलमध्ये टाकले. त्यानंतर कोर्टाने त्यांना जामीन दिला असंही सरोदेंनी म्हटलं.
महाविकास आघाडीला पाठिंबा देणाऱ्यांनी मतदानासाठी बाहेर पडावं
अनिल देशमुख, संजय राऊत यांच्यावरील गुन्हे सिद्ध होण्यापूर्वीच जेलमध्ये टाकले गेले हा कायद्याचा गैरवापर आहे. कायद्याच्या प्रक्रियेनुसार शिक्षा झाली पाहिजे. कायद्याचा असा वापर होतो तेव्हा नागरिकांनी उभं राहिले पाहिजे. निवडक पद्धतीने कायदाचा वापर केला जातो. देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना काळा चष्मा घातलाय. जे महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे लोक आहेत त्यांनी मतदानासाठी बाहेर आले पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान केले पाहिजे असं आवाहनही सरोदेंनी केले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.