Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष, मुंबईतल्या दोन बहिणींच्या गँगचं मोठं कांड

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचं आमिष, मुंबईतल्या दोन बहिणींच्या गँगचं मोठं कांड 


मुंबई : लग्नाचं आमिष दाखवून तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याची अनेक प्रकरणं यापूर्वी समोर आली आहेत. मुंबईतील आरे पोलीस सध्या अशाच एका प्रकरणाचा तपास करत आहेत. दोन तरुणींनी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीनं तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर लग्नाचं आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे.

दोन तरुणी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीनं तरुणांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत असत. त्यानंतर लग्नाच्या बहाण्याने त्यांची फसवणूक करत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. आरे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या कुटुंबाच्या विरोधात सुमारे सहा जणांनी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. एका युवकानं सुमारे 13 लाखांच्या फसवणुकीचा आरोप करून आरे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून हरप्रीत रामगडिया, मनीषा रामगडिया, बलविंदर रामगडिया आणि मनप्रीत रामगडिया या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या तरुणींच्या त्रासाला कंटाळून या युवकाने आरे पोलिसांकडे धाव घेतली होती. त्या वेळी पोलिसांकडून अपेक्षित सहकार्य मिळालं नाही. त्यानंतर त्याने सर्व पुरावे गोळा करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार, आरे पोलिसांनी हरप्रीत, तिची बहीण मनप्रीत, आई मनीषा रामगडिया आणि वडील बलविंद रामगडिया यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. रामगडिया कुटुंबावर युवकानं केलेल्या आरोपांबाबत त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दरम्यान, एफआयआरनुसार, आरेतल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या युवकाची हरप्रीतशी ओळख झाली. हरप्रीत त्याच कंपनीत को-ऑर्डिनेटर पदावर कार्यरत होती. युवकाच्या आरोपानुसार, हरप्रीतनं जाणूनबुजून त्याच्याशी मैत्रीची नाटक केलं. त्याला आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी ती कोणत्याही कारणानं त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली. त्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचा खोटा बनाव करून त्या युवकाची सहानुभूती मिळवली. त्यानंतर त्याने सांगितलं, की ती तिच्या कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन माझ्याशी लग्न करू इच्छित होती. तिच्या जाळ्यात अडकून त्याने काही जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीत वैदिक आणि धार्मिक पद्धतीने हरप्रीतशी विवाह केला.

पीडित युवकानं दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यावर काही दिवसांनी हरप्रीत आणि तिचे कुटुंबीय कधी आर्थिक परिस्थिती चांगली नाही तर कधी लग्नानंतर घर घेण्याच्या नावाखाली त्याच्याकडे पैशांची मागणी करू लागले. हरप्रीत आणि तिचे कुटुंबीय त्याच्याकडून रोख रक्कम, दागिने आणि कर्जाचा बहाणा करून मोठी रक्कम घेत होते. हरप्रीतच्या आईने तिच्या मुलीसाठी मुंबईत एक कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी करण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला. कर्ज घेऊन फ्लॅट खरेदी करणं त्याच्यासाठी अशक्य होतं. त्यामुळे त्यास त्याने नकार दिला. त्यामुळे हरप्रीत आणि तिचे आई-वडील त्याच्यापासून दूर राहू लागले. हरप्रीतनेही त्याच्यासोबत राहण्यास नकार दिला. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.