कोसी नदीवरील देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला, एकाचा मृत्यू; अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता
नवी दिल्ली: बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. बिहारमधील सुपौल येथे बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात लांब बाकौर पुलाचा काही भाग कोसळल्याने एका मजुराचा मृत्यू झाला आहे. तर 15 ते 20 कामगार जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस पोहोचले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. त्यात 30 मजूर गाडले गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुपौलमध्ये बांधकाम सुरु असलेल्या पुलाचे तीन स्लॅब पडले आहेत. 50, 51 आणि 52 क्रमांकाचे खांब पूर्णपणे कोसळून ही दुर्घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मारिचा गावाजवळ ही दुर्घटना घडली आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, अपघाताबाबत माहिती देताना सुपौलचे डीएम कौशल कुमार यांनी सांगितले की, मारिचाजवळ एका बांधकामाधीन पुलाचा काही भाग कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला. मधुबनी आणि सुपौल दरम्यान बकौर पूल बांधला जात आहे.
हा देशातील सर्वात लांब पूल असून तो भारत माला प्रकल्पांतर्गत बांधला जात आहे. या पुलावर एकूण 171 खांब उभारले जात आहेत. यामध्ये दीडशेहून अधिक खांब बांधण्यात आले आहेत. हा पूल 10.5 किलोमीटर लांबीचा आहे. त्याच्या बांधकामाचा खर्च सुमारे 1200 कोटी रुपये आहे. कोसी नदीवर हा पूल बांधला जात असून त्याची किंमत 984 कोटी रुपये आहे.या लांब पुलाच्या निर्मितीमुळे सुपौल ते मधुबनीमधील अंतर केवळ 30 किमीवर होणार आहे. हा पूल नसल्यामुळे पावसाळ्यात संपर्क तुटला होता. एवढेच नाही तर अंतरही 100 किमीने वाढले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.