Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा पुण्यातील 'आय ए एस लॉबी ' दणका

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा पुण्यातील  'आय ए एस लॉबी ' दणका 

पुणे : गेली काही वर्षे पुण्यातच ठाण मांडून बसलेल्या सनदी अधिकाऱ्यांना कडक शिस्तीचे म्हणून ओळख असलेल्या आणि आता केंद्रीय निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दणका दिला आहे. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासह सहकार आयुक्त सौरभ राव यांची बदली राज्य सरकारला करावी लागली.


तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने फेब्रुवारी अखेरीला दिला होता. या आदेशामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार होत्या. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह पुण्यातच पण इतर पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली होती. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र राज्य सरकारने त्यावर काहीही कारवाई न करता पुन्हा ही बदली रोखण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यावर आयोगाने सरकारची कानउघाडणी करत बदल्या कराव्याच लागतील, असे स्पष्ट केले.


दरम्यान, तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ पुण्यात असलेले अधिकारी बदली झालीच, तर पुण्यातच होण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यानुसार विभागीय आयुक्त पदावरून सौरभ राव यांची सहकार आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. सहकार आयुक्त अनिल कवडे हे लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. याच पदावरून ते सेवानिवृत्त होतील, असे वाटत असतानाच त्यांची साखर आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. आता त्यांच्या जागी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांची बदली करण्यात आली आहे. राव यांची ठाणे महापालिका आयुक्त म्हणून बदली झाली आहे. विक्रमकुमार यांची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली. त्यामुळे वर्षानुवर्षे पुण्यातच ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांना नियमावर बोट ठेवून त्यांची बदली करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.