फोन करून बाहेर बोलवलं अन् डोक्यात गोळी झाडली
छत्रपती संभाजीनगरमध्ये डोक्यात गोळी झाडून लघु उद्योजकाचा खून करण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळुज एमआयडीसी परिसरात ही घटना घडली आहे. या हल्ल्यानंतर मारेकरी दुचाकीने धुळे सोलापूर महामार्गावरून अंधाराचा फायदा घेत पसार झाले आहेत. ही घटना रात्री वाळुज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे बालाजी नगरात घडली आहे. शहरात या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सचिन साहेबराव नरोडे, असं हत्या झालेल्या लघुउद्योजकाचं नाव आहे. दरम्यान हे मारेकरी त्याच्या ओळखीचे असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि पोलीस उपायुक्त नितीन बगाडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील तपासाच्या सूचना केल्या आहेत.
डोक्यात गोळी झाडून हत्या
ही घटना रविवारी ( १७ मार्च ) रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली आहे. अज्ञात मारेकऱ्याने सचिन नरोडे यांच्या डोक्यात पाठीमागून गोळी झाडली. गोळी आरपार जाऊन लघु उद्योजक सचिन साहेबराव नरोडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. सचिन नरोडे यांची डस्टर कार महिन्याभरापूर्वी एका अज्ञात माथेफिरूने जाळली होती.
त्यांचा वडगावमध्ये उद्योग होता. तो त्यांनी काही दिवसांपूर्वी बंद केल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं आहे. सचिन नरोडे यांचं वडगाव शिवारात एक छोटेसं युनिट आहे. परंतु मागील चार महिन्यांपासून उद्योग बंद आहे. गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. कॉलनीतील नागरिकांकडून घटनेची माहिती जाणून घेतली.
मारेकऱ्याचा माग काढण्याचा प्रयत्न
रात्री उशिरा पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांनी तपासासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. यावेळी श्वान पथकाकडून मारेकऱ्याचा माग काढण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. बालाजीनगरात रविवारी सकाळपासून वीजपुरवठा खंडित असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. परंतु वीजपुरवठा कशामुळे खंडित होता, याची माहिती मिळू शकली नाही.
सचिन नरोडे यांच्या मोबाइलवर एका अज्ञात व्यक्तीने संपर्क करून त्यांना घराबाहेर बोलावून घेतल्याची माहिती मिळतेय. यानंतर अज्ञात व्यक्तीने त्यांना घरापासून अवघ्या १०० फुट अंतरावर नेलं. त्याठिकाणी अंधार होता. त्याने नरोडे यांच्या डोक्यात गोळी झाडली अन् तो पसार झाला. गोळीबाराच्या आवाजमुळे नागरिक घराबाहेर आले, तेव्हा सचिन नरोडे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.