अखेर ठरलं..! कमल हसन यांचा पक्ष 'इंडिया' आघाडीत सामील
प्रख्यात दाक्षिणात्य अभिनेते कलम हसन यांच्या मक्कल निधी मय्यम (MNM) पक्ष भाजपविरोधी इंडिया आघाडीत सहभागी झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष 'द्रमुक'ने आज (दि.९ मार्च) मित्रपक्षांसोबत जागावाटप करारावर शिक्कामोर्तब केले.
'एमएनएम'ला राज्यसभेची एक जागा निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे कमल हसन यांचे आता संसदीय राजकारणात पदार्पण होणार आहे.
कमल हसन आज (दि.९ मार्च) चेन्नईतील डीएमके कार्यालयात पोहोचले. येथे त्यांचे स्वागत मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी केले. यानंतर त्यांनी पक्षाध्यक्ष मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांची भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना एमएनएम पक्षाचे सरचिटणीस अरुणचलन यांनी सांगितले की, आम्ही लोकसभा निवडणूक लढवणार नाही. मात्र आमचा पक्ष द्रुमुकला पाठिंबा देईल. कलम हसन यांच्या पक्षाला द्रमुक 2025 च्या राज्यसभा निवडणुकीसाठी एक जागा देणार आहे.
कमल हसन आणि एम के स्टॅलिन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, आगामी लाेकसभा निवडणुकीत कमल हसन हे तामिळनाडू आणि एकमेव पुद्दुचेरी प्रदेशातील 39 लोकसभा मतदारसंघात द्रमुकच्या प्रचाराचे काम करणार आहेत.
कलम हसन यांनी आपला शब्द 'फिरवला'
आम्ही सरंजामशाही राजकारणापासून दूर राहणार आहोत. आमचा पक्ष भाजप विरोधी इंडिया आघाडीला पाठिंबा देणार नाही. 'निःस्वार्थपणे' राष्ट्राबद्दल विचार करतील याच्याशी आमची राजकीय युती होईल, असा दावा कमल हसन यांनी २१ फेब्रुवारी रोजी मक्कल निधी मय्यम पक्षाच्या सातव्या वर्धापन दिनी केला होता. मात्र अखेर त्यांनी इंडिया आघाडीत सहभागी होत आपलं राज्यसभेचे तिकिट फायनल केल्याची चर्चा तामिळनाडूच्या राजकारणात रंगली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.