Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं

आठ वर्षीय मुलीचा गळा आवळून पित्याने स्वतःला संपवलं


पिंपरी : राहत्या घरात गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. तसेच आठ वर्षीय मुलगी देखील घरात मृतावस्थेत आढळून आली. काळेवाडी येथे मंगळवारी (दि . १९) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली.

भाऊसाहेब भानुदास बेदरे (४३, रा. गुरुनानक नगर, थेरगाव, मूळ रा. बेदरेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि नंदिनी भाऊसाहेब बेदरे (वय ८), अशी मयतांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेदरे कुटुंब उदरनिर्वाहासाठी १५ वर्षांपासून पिंपरी- चिंचवड शहरात वास्तव्यास आहे. भाऊसाहेब बेदरे खासगी नोकरी करत होते. काही महिन्यांपूर्वी नोकरी गेल्याने ते चारचाकी वाहन चालवत होते. मात्र त्यातूनही पुरेसे उत्पन्न मिळत नसल्याने त्यांना आर्थिक चणचण भासत होती.

दरम्यान, भाऊसाहेब यांची पत्नी राजश्री गावाकडे गेल्या. सोमवारी (दि. १८) रात्री त्या गावाकडून निघाल्या. मंगळवारी पहाटे चार वाजता पुण्यातील शिवाजीनगर येथे पोहचल्यावर त्यांनी पती भाऊसाहेब यांना फोन केला. तुम्ही गाडी घेऊन या, असे त्यांनी भाऊसाहेब यांना सांगितले. मात्र, भाऊसाहेब आले नाहीत. त्यामुळे त्या घरी पोहचल्या. त्यावेळी घरात झोपलेल्या त्यांचा १५ वर्षीय मुलगा आशिष याने दरवाजा उघडला. मुलगी नंदिनीला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिने प्रतिसाद दिला नाही. तसेच पती भाऊसाहेब यांनी स्वयंपाक खोलीत गळफास लावून घेतल्याचे दिसून आले.

 

याबाबत माहिती मिळताच वाकड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. भाऊसाहेब आणि नंदिनी यांना पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. भाऊसाहेब यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे. गावाकडे असलेली जागा विक्री केली. मात्र त्यातील काही रक्कम मिळालेली नाही, असे सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

कारण अस्पष्ट

गळा आवळल्याने नंदिनी हिचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच भाऊसाहेब यांनी तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, खून आणि आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. वाकड पोलिस तपास करीत आहेत.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.