" तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो " अशोक चव्हाण यांचं हे विधान चर्चेत
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सभा, मेळावे घेत प्रचाराला सुरूवात केली आहे. या प्रचाराच्या सभेत नेते मंडळी एकमेकांवर खास आपल्या शैलीत टीका करताना दिसत आहेत. भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एका सभेत बोलताना विरोधी पक्षावर टीका केली. ‘भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात पाच वर्ष बोंबलत बसलो असतो’, असा टोला अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला लगावला आहे.
अशोक चव्हाण काय म्हणाले?
“जर ८० ते ९० टक्के लोकांच्या मनामध्ये फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील तर माझ्या मनातदेखील दुसरे कोणी असण्याचे कारण नाही. त्यामुळे मी हा धाडसी निर्णय घेतला. भाजपात येण्याचा निर्णय घेतला नसता तर मी पाच वर्ष विरोधात राहिलो असतो. दिल्लीत आमचे सरकार येण्याचा प्रश्नच नव्हता. मग काय करायचे? विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”, असे अशोक चव्हाण म्हणाले.
अशोक चव्हाण भाजपाचे स्टार प्रचारक
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर भाजपाकडून त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली. यातच काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकाचे बिगुल वाजले. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांच्या यादी जाहीर केल्यानंतर स्टार प्रचारकांची यादीही भाजपाने जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण यांचेदेखील नाव आहे. त्यामुळे आता काँग्रेसमधून भाजपात आलेले अशोक चव्हाण काँग्रेस उमेदवारांच्या विरोधात प्रचार करत आहेत.महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक पाच टप्प्यांत होणार आहे. यामध्ये १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे, २० मे रोजी मतदान होणार आहे. याबरोबरच देशात लोकसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी प्रचारसभा घेत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.