ओबीसी बहुजनतर्फे सांगली लोकसभा लढवणार, 'वंचित'च्या आंबेडकरांचाही मला पाठिंबा; प्रकाश शेंडगेंची मोठी घोषणा
सांगली : ओबीसी वंचित बहुजन पक्षातर्फे सांगली लोकसभेची निवडणूक लढवणार असून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वीच पाठिंबा जाहीर केला असल्याचे ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष, माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी जाहीर केले. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी धडपड करावी लागत आहे. हे बघवेना, असेही ते म्हणाले.
ओबीसी बहुजन पार्टीचा सांगली लोकसभेचा मेळावा सांगलीत होता. यासाठी अध्यक्ष शेंडगे सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. यावेळी ओबीसी बहुजन पार्टीचे उपाध्यक्ष टी. पी. मुंडे, जे. डी. तांडेल, प्रेमला साळी, शिवाजीराव नीळकंठ, सुरेश कोळेकर आदी उपस्थित होते.
श्री. शेंडगे म्हणाले, "राज्यात मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी लढा उभारला. त्यामुळे ओबीसी समाज भयभीत झाला. त्यांना आम्ही आधार देतोय. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सत्तेत जाण्याची गरज आहे. त्यामुळेच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. नवा पक्ष स्थापन केला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत आघाडीची चर्चा झाली, मात्र आंबेडकर यांनी मनोज जरांगे यांच्याशी चर्चा सुरू केल्याने आम्ही अस्वस्थ झालो होतो. मात्र त्यांची युती झाली नाही. दोन दिवसांत 'वंचित'बरोबर अन्य जागांसाठी चर्चा केली जाईल. राज्यात मराठा आरक्षणामुळे भाजप पिछाडीवर आहे.शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात फूट आहे. काँग्रेसमध्येही भांडणे आहेत. त्यामुळे आम्हाला संधी आहे. ओबीसी बहुजन पार्टीने कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराज यांना पाठिंबा दिला आहे. सांगलीतून मी लढण्याचा निर्णय घेतला आहे. आंबेडकर यांनी काही दिवसांपूर्वीच पाठिंबा जाहीर केला. गोपीचंद पडळकर एका पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे ते छुप्या पद्धतीने मला मदत करतील. जतला आमदार असताना पाण्याचा प्रश्न मिटवला, तेथे कॅलिफोर्निया केला. आता जिल्हा विकासाचे ध्येय आहे. विकासाचे नवे पर्व सुरू करायचे आहे."
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.