इस्लामपूरजवळ दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात चार दुचाकी जप्त, सांगली एलसीबीची कारवाई
सांगली: जिल्ह्यातील सांगली, मिरज, आष्टा आदी परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलास इस्लामपूरजवळ ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्याच्याकडून एक लाखाच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
जिल्ह्यातील दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले आहे. पथक वाळवा तालुक्यात गस्त घालत असताना बहादूरवाडी ते कोरेगाव रस्त्यावर एक अल्पवयीन मुलगा दुचाकी घेऊन जात असल्याचे पथकाच्या लक्षात आले. पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने सांगली, आष्टा, मिरज, चिंचणी वांगी आदी परिसरातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्यानंतर त्याच्याकडील चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, उपनिरीक्षक कुमार पाटील, अरूण पाटील, सचिन धोत्रे, अभिजित ठाणेकर, रोहन घस्ते, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकोडे, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.