या घरात रहस्यमयी घटना! दर तेराव्या दिवशी कुटुंबात एक मृत्यू
अजमेर : घरामध्ये भूत दिसल्याची बरीच प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. पण राजस्थानमधील एका घरात असं काही तरी घडतं आहे जे कल्पनेच्या पलीकडे आहे. या घरात वारंवार आग लागते आहे. आगीचं नेमकं कारण काय ते माहिती नाही. त्यातच दर तेराव्या दिवशी या घरात राहणाऱ्या कुटुंबाच्या एका सदस्याचा मृत्यू होतो आहे. त्यामुळे कुटुंबासह संपूर्ण गाव घाबरलं आहे.
चुरू जिल्ह्यातील सादुलपूर तालुक्यातील भेन्साली गावातील ही घटना. इथल्या एका घरात गेल्या आठवडाभराहून अधिक काळ गूढपणे आगीच्या घटना घडत आहेत. 13-13 दिवसांनी एकूण 3 मृत्यू झाले आहेत. या घटनेने कुटुंबीय हादरले असतानाच गावातील लोकही घाबरले आहेत. एकामागून एक मृत्यू आणि आगीमुळे हे कुटुंब भयभीत झाले आहे. पोलीसही आगीच्या घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी आले होते मात्र काहीही सापडलं नाही. आता ग्रामस्थांना येथे पहारा द्यावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकाच कुटुंबात महिनाभरात तीन मृत्यू
भूपसिंह नावाच्या व्यक्तीचं हे घर. गेल्या महिन्याच्या 1 तारखेला त्याच्या आजीचा मृत्यू झाला होता. 13 दिवसांनंतर, त्यांच्या लहान मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर 13 दिवसांनी मोठ्या मुलाचाही मृत्यू झाला. प्रत्येकाला एकदा उलट्या होऊन जीव गमवावा लागला.
ग्रामस्थांनी सांगितलं की, भूप सिंह यांच्या 82 वर्षीय आजी कस्तुरी देवी यांचे 1 फेब्रुवारी रोजी निधन झालं होतं. त्यानंतर 13 दिवसांनी त्यांचा 4 वर्षांचा मुलगा गरवीतचा मृत्यू झाला. 13 दिवसांनंतर, 28 फेब्रुवारी रोजी त्यांचा दुसरा मुलगा 7 वर्षांचा अनुराग याचाही मृत्यू झाला. त्यांचे दोन्ही पुत्र अकाली मृत्यूचे बळी ठरले.
वारंवार लागतेय आग
त्यांच्या घरात आग लागण्याच्या घटना घडत आहेत. घरातील बेडरूम, स्वयंपाकघर, खोल्या, जनावरांचा चारा, पेटी आणि कपडेही आगीत जळून खाक झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं. अचानक लागलेल्या आगीमुळे गावातील डझनभर लोक रात्रीच्या वेळीही सतर्क असतात. पण तरीही आग लागते.
भेन्साली येथील ओमप्रकाश शर्मा यांनी सांगितलं की, यामुळे केवळ भूपसिंहचं कुटुंबच नाही तर गावकऱ्यांचीही झोप उडाली आहे. घराला अचानक आग लागण्याच्या या घटना धक्कादायक आहेत. आग लागल्यानंतर ती रात्रंदिवस धगधगत राहते. ती विझवल्यानंतरही ती पुन्हा भडकू लागते.
गावातील 60 वर्षीय होशियार सिंह यांनी सांगितलं की, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन ट्रॅक्टरवर पाणी फवारणी यंत्रे बसवण्यात आली आहेत, जेणेकरून आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवता येईल. मात्र या गूढ आगीचं खरं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
एकाच घरात मृत्यू आणि आगीचं काय आहे रहस्य?
विज्ञानाबाबत माहिती देणारे राजकुमार यांनी सांगितलं की, आग ही एक रासायनिक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये इंधन आणि ऑक्सिडायझिंग घटक प्रतिक्रिया देतात. अशी अनेक रसायने आहेत जे हवेच्या संपर्कात आल्यावर आग लागते. फॉस्फरस हादेखील असाच एक पदार्थ आहे. पण भूपसिंह यांच्या घरात आग का लागते आहे, याचं कारण सांगता येत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.