भारतात कोणत्या लोकसभा मतदारसंघात फक्त मुस्लिम कुटुंबाची सत्ता? जाणून घेऊया
लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून सध्या जागावाटपावरून जोरदार चढाओढ सुरू आहे. यावेळी लोकसभा निवडणुका ७ टप्प्यांत होणार आहेत. १९ एप्रिल हा पहिला टप्पा असून १ जून हा मतदानाचा शेवटचा टप्पा आहे. तर ४ जूनला निकाल लागणार आहे. आज आपण मुस्लिम कुटुंबाचे वर्चस्व असलेल्या लोकसभेच्या जागेबद्दल जाणून घेणार आहोत. १९८४ पासून या जागेवरून एकही हिंदू नेता विजयी झालेला नाही. खरं तर, आपण हैदराबाद लोकसभा मतदारसंघाबद्दल बोलत आहोत. ज्यावर १९८४ पासून सतत ओवेसी कुटुंबाचे वर्चस्व आहे.
काँग्रेस नेते गोपालैया सुब्बू कृष्णा मेलकोटे यांनी १९६२ आणि १९६७ मध्ये ही जागा जिंकली होती. यानंतर त्यांनी १९७१ मध्ये काँग्रेस पक्ष सोडला आणि तेलंगणा प्रजा समितीमध्ये प्रवेश केला. १९७१ च्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदाही त्यांनी या जागी विजय मिळवला. १९७१ नंतर १९७७ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते के. एस. नारायण यांनी ही जागा जिंकली होती. त्यानंतर १९८० च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी ही जागा जिंकली पण यावेळी त्यांनी काँग्रेस (आय) च्या तिकिटावर निवडणूक लढवली.१९८४ नंतर या जागेवरून कोणताही हिंदू नेता पुन्हा जिंकू शकलेला नाही. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांनी पहिल्यांदा हैदराबादमधून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यानंतर सुलतान सलाउद्दीन ओवेसी यांनी १९८९ ते १९९९ पर्यंत सातत्याने या जागेवर विजय मिळवला.
सुलतान सलाहुद्दीन ओवेसी यांच्यानंतर त्यांचा मुलगा ओवेसी यांनी २००४ मध्ये या जागेवरून निवडणूक लढवली आणि ते जिंकले. तेव्हापासून २०१९ पर्यंत ते या जागेवरून चार वेळा खासदार म्हणून निवडून आले.आता पुन्हा एकदा २०२४ मध्ये असदुद्दीन ओवेसी आपल्या वडिलोपार्जित जागेवरून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.