भाजपमध्ये जातो तो संत होतो...' प्रशांत किशोर
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी अटक केली. दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणात ही कारवाई झाली आहे. ईडीच्या या कारवाईवरुन विरोधकांनी भाजपला फैलावर घेतले. तसेच, आम आदमी पक्षानेही शुक्रवारी अटकेविरोधात निदर्शने केली. या सगळ्यात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीदेखील या कारवाईवरुन भाजप आणि ED वर प्रश्न उपस्थित केले आहेत.
मीडियाशी संवाद साधताना प्रशांत किशोर म्हणाले, अशा प्रकारच्या कारवाईमुळे देशात ED विरोधी प्रतिमा तयार झाली आहे. जो भाजपसोबत नाही, त्याच्यावर ईडी-सीबीआय छापे टाकते, असे अनेकांना वाटत आहे. ईडी-सीबीआयने त्यांचे काम केले पाहिजे, ज्याची चूक असेल त्याची चौकशी करुन शिक्षा दिली पाहिजे, त्यात काही गैर नाही. पण, एखाद्या व्यक्तीविरुद्ध तपास सुरू झाला आणि तो भाजपमध्ये गेला, तर त्याच्याविरोधातील चौकशी थांबते.
लालू यादव असोत, टीएमसी असोत, अरविंद केजरीवाल असोत किंवा इतर कुणीही असो. देशातील लोकांना या कारवाईची कोणतीही अडचण नाही. अडचण अशी आहे की, ज्या व्यक्तीविरोधात तपास सुरू असतो, तो उद्या भाजपमध्ये गेला तर संत होतो. लोकांना याचा या गोष्टीचा आहे. कालपर्यंत कायद्याच्या नजरेत चूक करणारा, दोषी असणारा भाजपमध्ये गेल्यावर शुद्ध होतो. म्हणूनच लोक भाजपला वॉशिंग मशीन म्हणतात. तपास यंत्रणेचा वापर फक्त विरोधकांना घाबरवण्यासाठी केला जातोय का, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.