वायसीएम' रुग्णालयात डॉक्टर-पोलिसांमध्येच हाणामारी: निवासी डॉक्टर संपावर
पिंपरी : सीटी स्कॅनवरून हुज्जत घालत डॉक्टरांना मारहाण केल्यानंतर बाप-लेकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांच्या ताब्यातील बाप-लेकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना मज्जाव करताच डॉक्टरांनी पोलिसांवर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. त्यानंतर पोलिसांनीही दोन डॉक्टरांना चांगलाच चोप दिल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्री वायसीए रुग्णालयात घडला.
डॉक्टर आणि पोलीस भर रुग्णालयात एकमेकांना भिडल्याने एकच गोंधळ उडाला. वरिष्ठांनी मध्यस्थी केल्यानंतर समेट घडवून आणण्यात आला. त्यामुळे या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. मात्र, डॉक्टरांना मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाप-लेकावर पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोशी येथे एका मारहाणीत जखमी झाल्याने रिया पाटील, प्रणव पाटील आणि शरमन आरलेन या तिघांना नॉरमन लायरस आरलेन (वय ४८) आणि शरवीन नॉरमन आरलेन (वय २३) हे मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. वायसीएम रुग्णालयातील पदव्युत्तर पदवी संस्थेत शिक्षण घेत असलेल्या दोन निवासी डॉक्टरांनी तिघांवर उपचार केले. त्यानंतर रिया हिला सीटी स्कॅन करण्यास सांगितले. मात्र, आम्ही सीटी स्कॅन करणार नाही. आम्हाला ‘एमएलसी’ पेपर लवकर द्या तसेच जखमांचे प्रमाण वाढवून द्या, अशी मागणी केली. या कारणावरून दोघे डॉक्टर आणि रुग्णांसोबत असलेले नॉरमन व शरवीन यांच्यात वाद झाला.
बाप-लेकांनी दोघा डॉक्टरांना मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच, माझी आमदाराशी ओळख आहे. उद्या तुमच्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिली. मारहाणीचा हा प्रकार समजताच वायसीएम रुग्णालयात कार्यरत असणारे पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले. त्यांनी त्वरित नॉरमन व शरवीन या बाप-लेकाला ताब्यात घेतले. डॉक्टरांनी पोलिसांच्या ताब्यातील बाप-लेकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र, पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. याचा डॉक्टरांना राग आला. त्यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जात त्यांना धक्काबुक्की केली. इतर रुग्णांसमोर धक्काबुक्की झाल्याने पोलीसही चिडले आणि त्यांनीही दोघा डॉक्टरांची धुलाई केली. याला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला. महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटविले.
निवासी डॉक्टर संपावर
रुग्णांच्या नातेवाईकांकडून सातत्याने मारहाणीचे प्रकार घडत असल्याच्या निषेधार्थ वायसीएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारी सकाळपासून संप पुकारला. ३० डॉक्टर संपात सहभागी झाले होते. रुग्णालयात पोलीस चौकी उभारावी. खासगी सुरक्षारक्षकांची संख्या वाढवावी, अशी मागणी त्यांनी केली. प्रशासनाने त्यांच्या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री उशिरा डॉक्टरांनी संप मागे घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.