डोंबिवलीत रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत तिकीट ? फोटो व्हायरल झाल्यावर खळबळ
मराठमोळं, सुसंस्कृत, सुशिक्षितांचं शहर अशी डोंबिवलीची ओळख…मात्र याच मराठमोळ्या डोंबविलीतील एका घटनेमुळे खळबळ माजली आहे. मध्य रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत प्रिंट झालेलं तिकीट मिळाल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
हे तिकीट डोंबिवली ते घाटकोपर या स्थानकादरम्यानचे असून 8 मार्चला ते प्रिंट झाले होते. तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रामध्ये (प्रिंटर) बिघाड झाल्याने असे तिकीट मिळाले. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हे तिकीट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं असून त्यावरून प्रवाशांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे.
काय आहे प्रकरण ?
मध्य रेल्वे मार्गावरून दिवसाला लाखो प्रवासी प्रवास करत असतात. येथील डोंबिवली स्थानकातूनही लाखो प्रवाशांची ये-जा सुरू असते. त्याच डोंबिवली रेल्वे स्टेशनवर मिळालेलं एक तिकीट सध्या चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याचा फोटोही वेगाने व्हायरल होत आहे. 8 मार्चला प्रिंट झालेल्या या तिकीटावरील भाषा गुजराती असल्याचा दावा काही प्रवाशांकडून केला जात आहे. डोंबिवली ते घाटकोपर दरम्यानचे हे तिकीट असून या प्रकारामुळे सोशल मीडियावर वेगवेगळी चर्चा रंगली आहे. गुजराती भाषेतील या तिकिटाविषयी काही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून देखील विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.गुजराती भाषेती तिकीटामुळे ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सरकारवर टीका करत आहेत. तर, भाजप आणि महायुतीचे समर्थक हे मात्र, ते तिकीट गुजराती भाषेत नसल्याचा दावा करत आहेत. तिकीट प्रिंट करणाऱ्या यंत्रात बिघाड झाल्याने असे तिकीट प्रवाशांना मिळाले असावे, असा दावा मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे. तसेच हे तिकीट गुजराती भाषेत नसल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.