विद्यार्थ्यासोबत झालेल्या वादामुळे भडकला शिक्षक; बंदूक काढली अन् झाडली गोळी
शिक्षकाचं काम हे मुलांना शिकवणे आहे जेणेकरून ते जीवनात पुढे जातील, प्रगती करू शकतील. शिक्षकाचं काम केवळ पुस्तकं शिकवणं नाही तर विद्यार्थ्यांना चुकीचं आणि योग्य काय हे सांगणं देखील आहे, जेणेकरून ते आयुष्यात कधीही चुकीच्या मार्गावर जाऊ नयेत
मात्र, आजकाल असे शिक्षक क्वचितच आढळतात. आता तर शिक्षकही इतके संतापले आहेत की ते विद्यार्थ्यांवर लाठीमार करतात तर कधी एवढं मारतात की त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागतं. सध्या असंच एक प्रकरण चर्चेत आहे, ज्याने संपूर्ण जगाला हादरवून टाकलं आहे.
बांगलादेशातील एका वैद्यकीय महाविद्यालयाच्या शिक्षकाला नुकतंच निलंबित करण्यात आलं आहे. कारण त्याने भांडणाच्या वेळी बंदूक बाहेर काढली आणि एका विद्यार्थ्याच्या पायावर गोळी झाडली. ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ही घटना गेल्या सोमवारी घडली.
प्रकरण असं आहे की, 23 वर्षीय विद्यार्थी तोंडी परीक्षा देत असताना कॉलेजचे प्राध्यापक रेहान शरीफ यांच्याशी त्याचा वाद झाला. मग काय, शिक्षकाला राग अनावर झाल्याने त्याने बंदूक काढून विद्यार्थ्याच्या उजव्या गुडघ्यात गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी विद्यार्थ्याच्या खिशातील मोबाईलला लागली, त्यामुळे त्याचा जीव वाचला. पण तरीही त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं आणि त्याच्या पायावर शस्त्रक्रियाही करावी लागली.ढाका ट्रिब्यून वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा शिक्षकाने विद्यार्थ्यावर गोळी झाडली तेव्हा वर्गात 45 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी अनेक जण गोळीबारानंतर जखमी विद्यार्थ्याच्या मदतीसाठी धावले, तर काही विद्यार्थ्यांनी आरोपी शिक्षकाला एका खोलीत ढकलून बंद केलं. पोलिस येताच त्यांनी आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतलं. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे शिक्षकाकडे दुसरी बंदूकही होती. याशिवाय त्याच्या बॅगेतून 81 गोळ्या, चार मॅगझिन, दोन चाकू आणि 10 खंजीरही पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाने संपूर्ण बांगलादेशात खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.