यंदा महसलू वसूलीच्या 'टार्गेट'वर होणार परिणाम?मार्च एन्डच्या तोंडावर सांगलीचे मनुष्यबळ गोवा चेक पोस्टवर
सांगली : सध्या मार्च महिन्याच्या वसूलीची धूम सगळीकडे सुरू आहे. वित्तीय संस्थांसह शासकीय कार्यालये महसूल वसुलीचे उद्दीष्ट गाठण्यासाठी तारेवरची कसरत करत आहेत. यंदा मात्र राज्य उत्पादन शुल्कच्या वसूलीच्या 'टार्गेट'वर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील उत्पादन शुल्कच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गोवा चेक पोस्टवर ड्युटी लावण्यात आली आहे. सध्या पाच दिवसांच्या आठ टप्प्यात अशी २५ एप्रिलपर्यंत ड्युटी लावण्यात आली आहे. त्यामुळेच महसूलाचे उद्दीष्ट गाठताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
राज्य उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाने गेल्या वर्षी राज्य शासनाला ३७९ कोटींचा महसूल दिला होता. मार्च महिन्यात महसूल उद्दीष्टपूर्तीसह परवान्यांच्या नूतनीकरणासाठी उत्पादन शुल्कच्या कार्यालयात गर्दी होत आहे. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी अधिकारी, कर्मचाऱ्यांना याच काळात गोवा चेक पोस्टवर ड्युटी लावण्यात आली आहे. आगामी आर्थिक वर्षासाठी उत्पादन शुल्कच्या सांगली विभागाला ४५७ कोटी रूपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. ही उद्दीष्टपूर्ती सांगली जिल्ह्यातून होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.किमान मार्च महिना संपेपर्यंत गोवा तपासणी नाक्यावर अन्य जिल्ह्यातील अतिरिक्त मनुष्यबळ वापरावे अशी मागणी या विभागातील वरीष्ठ अधिकारी खासगीत करत आहेत. महसूल उद्दीष्टपूर्ती होण्यासाठी जिल्ह्यात मनुष्यबळाची गरज असताना गोवा तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचाऱ्यांना ड्युटी लावली जाते. त्यामुळेच परवान्यांचे नूतनीकरण आणि महसूल वसूली करण्यासाठी गोवा चेक पोस्टवरील नियुक्ती मार्चपर्यंत शिथील करून जिल्ह्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. उत्पादन शुल्कचे मुंबईतील वरीष्ठ अधिकारी याची दखल घेणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.