दुपारी २ वाजून ५७ मिनिटांनी मी देह सोडणार ; हिंगोलीत जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी नातेवाईकांसह अख्खा गाव जमला, पण..
जगात असे अनेक व्यक्ती असतात जे आपल्याला मरण कधी येणार आहे, याची माहिती असल्याचा दावा करतात. तसेच दुसऱ्याच्या मृत्यूची चाहुल सांगणारे काही भोंदूबाबाही असतात. अनेक लोक अशा अंधश्रद्धांच्या आहारी जाऊन भोंदू जे काही सांगतात ते सर्व खरे मानतात.
मात्र अखेर त्यांची फसगतच होत असते. असाच काहीसा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. येथे एका ७५ वर्षीय व्यक्तीने गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशीच आपल्याला मोक्ष मिळणार असल्याचे सांगत आपल्या कुटूंबाला तसेच नातेवाईक व गावकऱ्यांनाही आपल्या मृत्यूची वेळ सांगितली.
हिंगोली तालुक्यातील लिंबी गावात हा अंधश्रद्धेची घटना पहायला मिळाली. धोंडबाराव देवकते असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून यांनी मोक्ष प्राप्तीसाठी जिवंतपणीत आपल्या मृत्यूची तयारी केली. देवकते यांच्या घरात धार्मिक वातावरण असून धोंडबारावही शिक्षित आहेत. जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला. वृद्धाने आपल्या मरणाची वेळही सांगितली. यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली. या प्रकाराची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र या व्यक्तीला मृत्यू झाला नसून अंधश्रद्धेच्या बाजाराचा पर्दाफाश झाला.
आज दुपारी दोन वाजून ५७ मिनिटांनी मी देह सोडणार आहे. असं या धोंडबाराव देवकते यांनी घरच्या सर्वांना सांगितलं होतं. माझ्या मरणाची तयारी करा, नातेवाईकांना बोलावून घ्या. भजन कीर्तन, फराळ पाण्याची सोय करा, असे देवकते यांनी त्यांच्या कुटूंबाला सांगितले होते. त्यांच्या मुलांनी वडिलांच्या सांगण्याप्रमाणे नातेवाईकांना निरोप धाडले गावकऱ्यांचीही गर्दी जमली. घटनास्थळी पोलीस देखील दाखल झाले.धोंडबाराव देवकते यांच्या घरात सकाळपासूनच विना, पेटी, टाळ मृदुंग लाऊन भजन सुरू होते. २ वाजून ५७ मिनिटे झाल्यानंतर देवकते यांनी अजून दोन तासांनी म्हणजे ४ वाजून ५७ मिनिटांना मी देह सोडणार, असा दावा केला. मात्र त्यांनी दिलेली दुसरी वेळही निघून गेल्यावर देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी निव्वळ अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे समोर आले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.