पाळणाघरात मुलांना मारहाण बांधून ठेवले, उलटे टांगले
डोंबिवली : डोंबिवलीतील एका पाळणाघरात मुलांना मारहाण करून बांधून ठेवणे, त्यांना उलटे टांगण्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याने हे प्रकरण उघडकीस आणले आहे. या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी पाळणाघर चालविणाऱ्या गणेश प्रभुणे, त्यांची पत्नी आरती आणि त्या ठिकाणी काम करणारी राधा नाखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीत हॅपी कीड डे केअर हे पाळणाघर आहे. तेथे चिमुकल्यांचा छळ होत असल्याचे साधना सामंत या महिलेच्या पुढाकाराने समोर आले. साधना ही १ मार्चला या पाळणाघरात नोकरीला लागली. तिने मुलांसोबत होत असलेला प्रकार पाहून काम न करण्याचे ठरविले. हा प्रकार मुलांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी तिने मुलांवर होत असलेल्या छळवणुकीचा व्हिडीओ काढला.
गुन्हा दाखल करण्यास सुरूवातीस टाळाटाळ
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांनी मंदार यांना सांगितले की, ज्या पाळणाघरात तुम्ही तुमच्या मुलीला ठेवतात, त्या मुलीसोबत काय प्रकार घडतो, त्याचा व्हिडीओ आमच्या हाती आला आहे. मंदार यांनी तत्काळ गावंड यांच्याशी संपर्क साधला. शिवसेना महिला पदाधिकारी यांच्यासोबत मंदार आणि अन्य पालकांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. आधी चाइल्ड वेल्फेअर कमिटीला जाऊन तक्रार द्या. नंतर पाहू, असे सांगितले. तक्रार दाखल न केल्याने हे प्रकरण सहायक पोलिस आयुक्त सुनील कुराडे यांच्याकडे गेले. हा प्रकार ऐकून कुराडे यांनी याप्रकरणी तत्काळ तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश रामनगर पोलिसांना दिले. त्यानुसार कारवाई करण्यात आली.
* डोंबिवलीत राहणारे मंदार ओगले आणि त्यांची पत्नी अनुजा आणि तीन वर्षांची मुलगी गार्गी सोबत राहतात. मंदार हे सरकारी गाडीवर चालक आहेत. त्यांची पत्नी अनुजा खासगी कंपनीत कामाला आहे. दोघेही कामावर असतात. त्यादरम्यान ते मुलगी गार्गी पाळणाघरात ठेवत होते.
* या व्हिडीओत लहान मुलांना बांधून ठेवणे, त्यांना उलटे करणे, मारहाण करून भीती दाखविणे असे प्रकार समोर आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.