भाजप हॉट्रिक करणार, की काँग्रेस बालेकिल्ला मिळवणार?
सांगली: सांगली लोकसभा मतदार संघातून भाजपचे खासदार संजयकाका पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांच्यात दुहेरी लढत होईल, असे चित्र दिसत असले तरी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे ही लोकसभेच्या मैदानात उतरण्याची तयारीत असल्याने तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असणार, की स्वतंत्र लढणार हे अद्याप गुलदस्त्यात असले तरी पै. चंद्रहार पाटील यांची वंचितशी बोलणी सुरू असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणूकीत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार हे निश्चित.
सांगली लोकसभा मतदारसंघात भाजप विजयाची हॅट्रिक करण्याच्या तयारीत आहे, तर गमावलेला बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी काँग्रेसने गटबाजी दूर करून कंबर कसली आहे. उमेदवारीवरून गटबाजी उफाळणार नाही, याची दक्षता भाजप कशी घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.महायुतीकडून भाजपतर्फे खासदार संजयकाका पाटील तिसऱ्यांदा उमेदवारीसाठी आणि विजयासाठी कामाला लागले आहेत. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी इच्छुक असल्याचे जाहीर केल्यामुळे व पक्षातीलच एका गटाची ताकत त्यांच्यामागे असल्याने भाजपकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याची उत्सुकता - शिगेला पोहोचली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला जाणार, हे जवळपास स्पष्ट आहे. सांगलीतून कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील उमेदवार असतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सांगली दौऱ्यावेळी स्पष्ट केलेले आहे. तरीही जागा वाटपात 'कोल्हापूर'च्या बदल्यात 'सांगली', असा पवित्रा शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतल्याची चर्चा आहे. निवडणूक आचारसंहिता लागू होण्यास काही दिवसच उरले असताना, उमेदवारीवरून महायुती आणि महाविकास आघाडीत संभ्रम कायम दिसत असले तरी सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहील असा अंदाज आहे.
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत असणार, की स्वतंत्र लढणार, हे अजूनही गुलदस्त्यात आहे. वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणूक रिंगणात उभी ठाकली तरी, खरी लढत महायुती व महाविकास आघाडी यांच्यातच होणार, हे स्पष्ट आहे. खासदार संजयकाका पाटील हे भाजपकडून लोकसभेसाठी पुन्हा इच्छुक आहेत. मात्र यावेळीही त्यांना उमेदवारीसाठी पक्षातील नाराजांशी झगडावे लागत आहे. पक्षातील स्थानिक नेत्यांशी अनेकदा पंगा घेऊन त्यांनी त्यांची नाराजी ओढवून घेतली आहे.भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांचा तर त्यांच्याशी उभा दावा आहे. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याशीही त्यांचे सूर जुळल्याचे दिसत आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त करून उमेदवारीत चुरस निर्माण केली आहे. महाविकास आघाडीकडून सांगलीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाला मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रयत्न केले. मात्र, ही जागा काँग्रेसकडेच राहील हे स्पष्ट आहे.
उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचे पाहून काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशालदादा पाटील यांनी मतदारसंघात नेते, कार्यकर्ते, मतदारांच्या गाठीभेटीची एक फेरी पूर्ण केली आहे. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे युवा नेते माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी तन, मन, धनाने प्रयत्न केल्यास महाविकास आघाडीचा निवडणुकीत विजयाचा मार्ग सोपा होऊ शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.