पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवुन मुलींचे शोषण करणाऱ्या मांत्रिकासह टोळी गजाआड
ठाणे: पैशांचा मोह खूप वाईट… त्यासाठी माणूस काहीही करू शकतो. अशाच पैशांच्या मोहामुळे काही विपरीत घडू शकतं. काहीवेळा आयुष्यही उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. अशीच एक घटना ठाण्याच उघडकीस आली आहे. पैशाचा पाऊस पाडून देतो अशी भूलथाप मारून महिला व मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या टोळीस ठाणे गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. करोडो रुपये मिळतील असे आमिष दाखवून ही टोळी गरीब मुलींना आपल्या जाळ्यात ओढत होती. या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याच्या राबोडी येथील एका अल्पवयीन मुलीचे या टोळक्याने शोषण केल्यानंतर हा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका पीडित मुलीने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि या प्रकरणाचा तपास ठाणे गुन्हे शाखा युनिट एककडे सोपवण्यात आला होता. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात असलम शम्मीउल्ला खान, सलीम जखरुद्दीन शेख या दोघांना 17 फेब्रुवारी 2024 रोजी अटक केली. तर या गुन्ह्यातला मुख्य मांत्रिक साहेबलाल वजीर शेख उर्फ युसूफ बाबा यास 27 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी अटक केली. तसेच या टोळीत आणखी सदस्य सक्रिय असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तौसिफ शेख , शबाना शेख , शबीर शेख या तिघांना 29 फेब्रुवारी रोजी राबोडीतून तर हितेंद्र शेट्टे यास 1 मार्च 2024 रोजी बेड्या ठोकत गजाआड केले.
त्यांची कसून चौकशी केली असता, या टोळीने अनेक महिला व मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे स्पष्ट झाले आहे. पैशाचा पाऊस पाडून देतांना मांत्रिक बाबाच्या अंगात जीन येतो व त्यास विधीस बसलेल्या मुलीसोबत शरीरसंबंध ठेवण्याची इच्छा होते असे ही टोळी मुलींना पटवून देत होती. या टोळीने अशाच प्रकारे अनेक मुलींचे लैंगिक शोषण केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.