Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन रूग्णालयांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळेल- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन रूग्णालयांमुळे गोरगरीब जनतेला आधार मिळेल- पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

सांगली, दि. 10  : जिल्हा रूग्णालय व माता बाल संगोपन या सांगली येथे नविन बांधण्यात येणाऱ्या रूग्णालयांच्या माध्यमातून येत्या वर्षभरात आरोग्याच्या चांगल्या सुविधा निर्माण होतील. आरोग्य पंढरीला साजेशा अशा सोयी सुविधा या रूग्णालयांच्या माध्यमातून मिळतील. गोरगरीब जनता शासकीय हॉस्पीटलमध्ये येते. त्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील असून या रूग्णालयांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला आधार मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केले.

पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांचे भुमीपूजन व कोनशिला अनावरण पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम, माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, निता केळकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सारंगकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, माजी महापौर संगीता खोत, स्वाती शिंदे गीतांजली ढोपे पाटील, माजी नगरसेवक नगरसेविका यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे म्हणाले, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे बांधण्यात येणाऱ्या 100 खाटांच्या जिल्हा रूग्णालयासाठी 46 कोटी रूपये व माता बाल संगोपन रूग्णालयासाठी 36 कोटी रूपये अशा एकूण 82 कोटी रूपयांचया रक्कमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मिरज येथेही नर्सिंग कॉलेज व 100 बेडचे माता बाल संगोपन रूग्णालय होत आहे. मिरज येथे मल्टीपर्पज हॉस्पीटल सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यामुळे सांगली जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्याच्या मोठ्या सोयी सुविधा उपलब्ध होतील. आरोग्य, शिक्षण, पाणी व्यवस्था, ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शासकीय रूग्णालयातून गोरगरीब जनतेला सर्व औषधे मिळावीत यासाठी डीपीडीसीमधून निधी देवू, असे ते यावेळी म्हणाले.

खासदार संजय पाटील म्हणाले, मिरज व सांगली ही वैद्यकीय नगरी म्हणून प्रसिध्द आहे. सांगली येथे होणाऱ्या 100 बेडच्या नविन दोन रूग्णालयांचा गोरगरीब जनतेला लाभ होईल. या रूग्णालयांच्या माध्यमातून रूग्णांची सेवा व्हावी, त्यांना दिलासा मिळावा. या रूग्णालयांचे काम लवकर पूर्ण करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन रूग्णालय सांगली येथे होण्यासाठी 2017 पासून पाठपुरावा व प्रयत्न सुरू केले होते. या रूग्णालयांमुळे एक चांगली सुविधा निर्माण होईल. काहीवेळा रूग्णांना बाहेरून औषधे आणावी लागतात, हा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, असे ते यावेळी म्हणाले. 

प्रास्ताविकात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम यांनी पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय आवार सांगली येथे जिल्हा रूग्णालय सांगली व माता बाल संगोपन रूग्णालय या 100 खाटांच्या दोन नुतन रूग्णालयांमुळे अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होतील. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, सर्व सोयीयुक्त हॉस्पीटल सुरू झाल्यामुळे एक सक्षम आरोग्य व्यवस्था निर्माण होईल व  गोरगरीब जनतेला चांगली आरोग्य सेवा मिळेल. जिल्ह्यातील आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न करू, असे ते यावेळी म्हणाले. आभार डॉ. प्रमोद चौधरी यांनी मानले. कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.