धक्कादायक! १० किलो मटणासाठी दोन दिवस पडून राहिला महिलेचा मृतदेह
ओदिशामधील मयूरभंज परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे १० किलो मटणाचं भोजन न दिल्याने एका वृद्ध महिलेचा मृतदेह दोन दिवस पडून राहिला. तसेच तिच्यावर अंत्यसंस्कार होऊ शकले नाहीत. अखेरीस या मृत महिलेच्या मुलाने गावजेवण देण्याची तयारी दर्शवली. तेव्हा ग्रामस्थ या महिलेच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यास तयार झाले.
मयूरभंजमधील तेलाबिला गावामध्ये सोमबारी सिंह या ७० वर्षीय महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. स्थानिक रीतिरीवाजांनुसार कुणाच्याही कुटुंबात विवाह किंवा मृत्यू झाल्यास ग्रामस्थांना गावजेवण देण्याची प्रथा आहे. या प्रथेप्रमाणे ग्रामस्थांनी मृत महिलेच्या मुलाकडे मटणाचं जेवण देण्याची मागणी केली. मात्र गरिबी आणि गावजेवण देण्याइतपत पैसे नसल्याने त्याने ही मागणी पूर्ण करणं कठीण असल्याचं सांगितलं.
मिळत असलेल्या माहितीनुसार सोमबारीच्या कुटुंबामध्ये दोन लग्न समारंभ झाले होते. त्यावेळीही अशा प्रकारे गावजेवण दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे सरपंच आणि इतर लोक नाराज होते. शनिवारी सोमबारी हिचा मृत्यू झाला. तेव्हा ग्रामस्थांनी याबाबत तक्रार मांडली तसेच मृत सोमबारी हिच्यावर अंत्यसंस्कार करायचे असल्यास मृताच्या कुटुंबाने १० किलो मटण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली.
मृत सोमबारी सिंह हिच्या मुलाने गावकऱ्यांची ही मागणी नाकारली. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अंत्यसंस्कारामध्ये सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे मृत महिलेचा मृतदेह दोन दिवस घरातच पडून राहिला. काहीच तोडगा निघत नसल्याने अखेर मृत महिलेच्या मुलाने गावकऱ्यांची मागणी मान्य केली. तसेच गावजेवणासाठी मटण उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवली. त्यानंतर गावकरी मृत सोमबारीवर अंत्यसंस्कार करण्यात तयार झाले व तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेबाबत मृत महिलेच्या मोठ्या मुलाने सांगितले की, ग्रामस्थांनी जेवणासाठी बोकडाचं मटण मागितलं होतं. आम्ही मागच्या दोन दिवसांपासून आम्ही आईच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वाट पाहत होतो. त्यामुळे शेवटी गावकऱ्यांची ही मागणी मी मान्य केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.