जिद्दला पेटलो तर स्वतःचही ऐकत नाही : चंद्रहार पाटलांनी लोकसभेच्या आखड्यात शेड्डू ठोकला
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित सांगली येथे सभा पार पडली. त्यावेळी ठाकरे गटाचे नेते चंद्रहार पाटील म्हणाले, 'आम्ही जिद्दीला पेटलो तर स्वत:चंही ऐकत नाही. कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. लोकसभेची उमेदवारी देताना प्रत्येक पक्षाकडून विचार केला जातो. त्याचे वडील खासदार होते का? आमदार होते का? त्याची पार्श्वभूमी काय आहे. शिक्षण संस्था, साखर कारखाने आहेत का? हा विचार केला जातो. परंतु उद्धव साहेबांनी माझी पार्श्वभूमी न पाहाता एका शेतकऱ्यांच्या मुलाला लोकसभेच्या उमेदवारीचा शब्द दिला. मला शब्द देऊन तुम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सन्मान केला आहे'.
चंद्रहार पाटील म्हणाले, आज अभिमानाने सांगतो की, सांगली जिल्ह्यासाठी रक्ताचे पाणी करुन ३२ वर्षानंतर महाराष्ट्र केसरीची गदा मिळवून दिली आहे. डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मी ३२ वर्षांनंतर मिळवून दिला आहे. कुस्तीगिर परिषदेची स्थापना झाल्यानंतर सांगली जिल्ह्यात तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा आणणारा हा पैलवान आहे. आजपर्यंत जे केलं ते सांगली जिल्ह्यासाठी केलं. जे केलं ते छाती ठोकपणे केलं. सांगली जिल्ह्याची मान शरमेने खाली जाईल, अशी कोणतीही गोष्ट मी केली नाही.
पुढे बोलताना चंद्रहार पाटील म्हणाले, शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या बैलगाडी शर्यतीसाठी आम्ही काम केलं. भारतातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीच्या स्पर्धा आम्ही दोन वेळेस सांगली जिल्ह्यात भरवल्या. अनेक पक्षांनी राजकारण डोळ्यासमोर ठेऊन अनेक यात्रा काढल्या. भारतीय सीमेवरील जवानांना आम्ही रक्त पाठवलं. फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवले. लाल मातीची सेवा करण्यासाठी मी माझ्या गावी विटा येथे सर्वात मोठी तालीम उभी करत आहे. कुस्तीची माहिती पाहिजे असेल तर सांगली जिल्ह्यात यावं लागेल, अशी तयारी मी करतोय. तुमच्या साक्षीने एक शब्द देतो. ज्यावेळेस माझी २०२९ ला इथे सभा होईल. तेव्हा सांगलीत विमानतळ तयार झालं असेल. इथेच तुमचे स्वागत होईल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.