मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर '१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार आहे, अशी सणसणीत टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला.
रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडी आघाडीची सभा आयोजित करण्यात आली आहे. याविषयी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित 'ठगो का मेला' कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला. देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर '१०० कोटी वसुली फाईल्स'ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. याशिवाय 'वाझे की लादेन फाईल्स', 'खिचडी फाईल्स', 'कोविड बॅग फाईल्स' असे अनेक चित्रपट काढता येतील."
त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. बाकी तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही," असेही ते म्हणाले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.