Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

ड्रीमगर्ल हेमा मालिनी तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणूक लढवणार

ड्रीमगर्ल हेमा मालिनी तिसऱ्यांदा मथुरेतून निवडणूक लढवणार 

सात टप्प्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत २६७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. भाजपच्या यादीत अनेक स्टार उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील अग्रभागी असलेले नाव म्हणजे ड्रिम गर्ल म्हणून हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या हेमा मालिनी यांचे. त्या उत्तर प्रदेशच्या मथुरा येथून पुन्हा एकदा निवडणूक लढवणार आहेत.


अभिनेत्री ते खासदार असा प्रवास करणाऱ्या हेमा मालिनी तिसऱ्यांदा लोकसभेत जाण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आपल्याला पुन्हा मथुरा येथूनच निवडणूक लढवायला आवडेल अशी भावना त्यांनी अनेक वेळा व्यक्त केली होती. मथुरेतून जर आपल्याला उमेदवारी मिळाली नाही तर अन्य कोणत्याही मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले होते व त्यानुसार पक्षानेही त्यांच्यावर विश्‍वास दर्शवला आहे.


राजकारणात आणि चित्रपटसृष्टीतही सक्रिय-

अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शिका आणि सगळ्यांत महत्वाचे म्हणजे प्रख्यात नृत्यांगना असा प्रवास करत हेमा मालिनी यांनी लोकशाहीचे मंदिर गाठले. राज कपूर यांच्या सपनों का सौदागर या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर ड्रिम गर्ल या नावाने त्यांनी जगभर प्रसिध्दी मिळवली. १९८१ मध्ये त्यांनी प्रख्यात अभिनेते धर्मेंद्र यांच्याशी विवाह केला. आता त्या राजकारणात आणि चित्रपटसृष्टीतही सक्रिय असतात. धर्मेंदही एकदा भारतीय जनता पार्टीकडून बिकानेर येथून लोकसभेत गेले होते.

२००४ मध्ये भाजपमध्ये दाखल-

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबच्या गुरूदासपूर येथून भाजपकडून अभिनेते विनोद खन्ना निवडणूक लढवत होते. त्यांच्या प्रचारासाठी म्हणून हेमा मालिनी यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले. फेब्रुवारी २००४ मध्ये त्या अधिकृतपणे भाजपमध्ये दाखल झाल्या. २००३ ते २००९ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या होत्या. भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी राष्ट्रपतींद्वारे नियुक्त केले जाणारे सदस्य म्हणून हेमा मालिनी यांची राज्यसभेवर पाठवणी केली होती.

२०१० मध्ये त्या भाजपच्या सरचिटणीस झाल्या आणि २०११ मध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली जावी अशी शिफारस भाजप नेते अनंत कुमार यांनी केली होती. त्या निवडणुकीत हेमा मालिनी यांनी मथुरेचे तत्कालीन खासदार जयंत चौधरी यांचा तब्बल साडेतीन लाखांनी पराभव केला होता. २०१९ च्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रीय लोकदलाचे नेते कुंवर नरेंद्र सिंह यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. त्यांच्या विरोधात असलेले कॉंग्रेसचे उमेदवार महेश पाठक तिसऱ्या स्थानावर होते व त्यांना केवळ २८ हजार मते मिळाली होती.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.