5 व्या वर्षी कॉम्प्युटर शिकला,13 व्या वर्षी त्याने स्वतःची कंपनी सुरु केली
नवी दिल्ली : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हणतात. अशी मुलं मोठेपणी त्यांचं कर्तृत्व सिद्ध करतात. काही मुलं अफाट बुद्धिमत्तेची असतात, जी बालपणीच त्यांच्या बुद्धीची चमक जगाला दाखवतात. केरळमधल्या आदित्यन राजेश वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी कम्प्युटर शिकला आणि तेराव्या वर्षी स्वतःची कंपनीदेखील स्थापन केली. आता मल्टिनॅशनल कंपनी बनवण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खेळण्यांशी खेळण्याच्या वयात आदित्यन याला काही वेगळं करावं अशी इच्छा होती. वयाच्या पाचव्या वर्षीच त्याला कम्प्युटर शिकण्याची आवड निर्माण झाली. नुसती आवडच नाही, तर त्यात त्यानं मास्टरी मिळवली. नवव्या वर्षी आदित्यन याने स्वतःचं अॅप तयार केलं. मोठेपणी कोण व्हायचं, काय करायचं हे ज्या काळात मुलं ठरवतात, त्या वयात आदित्यनने स्वतःची कंपनी स्थापन केली. देशातला सगळ्यात कमी वयाचा सीईओ असलेला आदित्यन राजेश याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे. मूळचा केरळचा असलेल्या आदित्यन याच्याकडे आज दुबईमध्ये एक कंपनी आहे.
कसं आहे अॅप?
आदित्यन यानं नवव्या वर्षी एक अॅप तयार केलं. त्यात इतर मोबाइल अॅप अपलोड करायला सुरुवात केली. त्याचं नाव Aptoid असं होतं, तो अॅप्सचा अल्टरनेटिव्ह प्लॅटफॉर्म होता. त्यानंतर क्लायंटसाठी लोगो आणि वेबसाइट बनवण्याचं काम सुरू केलं. 17 डिसेंबर 2017 ला अवघ्या तेराव्या वर्षी आदित्यन यानं Trinet Solutions या नावानं स्वतःची कंपनी स्थापन केली.
पाचव्या वर्षीच कम्प्युटरची आवड
खलीज टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आदित्यननं सांगितलं, की त्याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षीच कम्प्युटर वापरायला सुरुवात केली होती. आदित्यनचा जन्म केरळमधल्या थिरुवला इथं झाला. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय दुबईमध्ये गेले. आदित्यनला त्यांच्या वडिलांनी पहिल्यांदा BBC Typing ही वेबसाइट दाखवली होती. त्यावर मुलं टायपिंग शिकू शकत होती.आदित्यन बहुतांश वेळ कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजीसाठी द्यायचा, त्यामुळे त्याला फारसे मित्र नव्हते. आदित्यन सांगतो, की सहाव्या वर्षी तो जास्तीत जास्त वेळ यू-ट्यूबवर कार्टून पाहण्यात आणि स्पेलिंग बीसारखे खेळ खेळण्यात घालवायचा. हळूहळू कम्प्युटर आणि टेक्नॉलॉजी समजू लागली आणि नवं काही करण्याची इच्छा तयार झाली.
गुगल क्रोमसारखा ब्राउझर केलं तयार
आदित्यन यानं आशीर्वाद ब्राउझर तयार केला. तो गुगल क्रोमप्रमाणे काम करत होता; मात्र तितका कठीण नव्हता. शाळेतल्या दोन मित्रांसोबत मिळून त्याने Trinet Solutions ही कंपनी स्थापन केली. अठराव्या वर्षापर्यंत स्वतःच्या कंपनीचा मालक होण्याचा निश्चय आधीच केला असल्याचं आदित्यन याने सांगितलं. कंपनी स्थापन केल्यावर 12 क्लायंट्सना स्वतःच्या कंपनीची डिझाइन आणि कोडिंगची सेवा उपलब्ध करून द्यायला त्यानं सुरुवात केली.
आदित्यन यानं मल्टिनॅशनल कंपनी स्थापन करण्यासाठी Tangled नावाची आणखी एक कंपनी स्थापन केली आहे. त्याशिवाय त्याचं स्वतःचं यू-ट्यूब चॅनेल आणि ब्लॉगही आहे. नुकतंच त्यानं शालेय शिक्षण पूर्ण केलं. आता तो सिक्युअर माय स्कॉलरशिप यांच्या साह्यानं इंटर्नशिप करत आहे. स्वतःच्या कंपनीसाठी निधी गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.