नांदेड, हिंगोली, परभणी भूकंप 4.2 रिष्टर स्केलची तीव्रता, नागरिकांत भीतीच वातावरण
नांदेड : मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड , परभणी , हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.
आज सकाळी मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली भागांत भूकंपाचे धक्के जाणवले. अनेकजण घाबरुन घराबाहेर आले. नांदेडच्या उत्तर भागात भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळत आहे. भूकंपाची तीव्रत रिश्टर स्केलवर 4.2 अशी नोंद करण्यात आली आहे. अनेक लोक घाबरून रस्त्यावर आले. दरम्यान, यापूर्वी मार्चच्या पहिल्या आठवड्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंपाचं केंद्र हिंगोलीजवळ
हिंगोली जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असून 3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज सकाळी सहा वाजून नऊ मिनिटाच्या सुमारास भूकंपाचे दोन धक्के जाणवले आहेत. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर असून याची तीव्रता हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना या लोकांची तीव्रता जाणवली आहे. या भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या त्यामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा गेल्याची माहिती आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीच वातावरण निर्माण झाला आहे. दांडेगाव येथील अनेक सिमेंटच्या घरांना तडे गेले आहेत.
भूकंप कसा होतो?
भूगर्भातील हालचालींमुळे प्रचंड प्रमाणात उर्जेचं उत्सर्जन होतं आणि त्याच्या 'भूकंप लहरी' तयार होतात. त्यानंतर पृथ्वीच्या पृष्ठभागाची हालचाल होते. त्यामुळे जमीन थरथरणं, हलणं, जमिनीला भेगा, कंपन होणं तसेच अचानक काही क्षण हादरणं यास भूकंप म्हणतात. भूकंपामुळे भूपृष्ठाचा भाग मागे-पुढे किंवा वर-खाली होतो. साहजिकच त्यामुळे भूगर्भात निर्माण होणारे धक्के आणि लाटा जमिनीच्या आत आणि वरच्या पृष्ठभागावर सर्व दिशांनी पसरतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात. भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. तीव्र स्वरूपाच्या लाटा किंवा हादरे सर्वप्रथम या केंद्रालगत येऊन पोहोचतात, त्यामुळे तेथे हानीचे प्रमाण सर्वात जास्त असते. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते. भूकंपालेख यंत्रांवर धक्क्यांची नोंद आपोआप होत राहते.
भूकंप झाल्यानंतर काय काळजी घ्यावी?
तुम्ही एखाद्या इमारतीत असताना भूंकपाचे तीव्र धक्के जाणवू लागले, तर तात्काळ एखाद्या मजबूत फर्निचरचा आसरा घेऊन त्याखाली जाऊन लपा. किंवा एखाद्या कोपऱ्यात उभे राहून तुमचा चेहरा आणि डोकं झाकण्याचा पुरेसा प्रयत्न करा. शक्य झाल्यास तात्काळ इमारतीतून बाहेर पडा आणि मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या वाहानात बसले असल्यास तात्काळ वाहन थांबवा आणि आतच बसून राहा. जर तुम्ही ढिगाऱ्याखाली अडकले असाल तर चुकूनही काडेपेटी जाळू नका. तसंच अजिबात हलण्याचा प्रयत्न करु नका. ढिगाऱ्याखाली अडकल्यानंतर एखाद्या पाईप किंवा भिंतीवर हळूहळू हात मारा. जेणेकरुन बचाव पथक तुमच्यापर्यंत पोहचू शकेल.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.