3 महिन्यांपासून सतत त्रास.. रॅगिंग सहन न झाल्याने दिव्यांग विद्यार्थिनीला ब्रेन स्ट्रोक
कॉलेजमध्ये असताना अनेक जणांना रॅगिंगचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. हे जरी बेकायदेशीर असले तरी कॉलेजमध्ये अनेक सीनिअर विद्यार्थी ज्युनिअर्सचं रॅगिंग करतात. बऱ्याच वेळेस ते मजेखातर असतं, पण त्यामुळे एखाद्याला त्रास होऊ शकतो, आयुष्यही उद्ध्वस्त होऊ शकतं.
असाच एक रॅगिंगचा धक्कादायक प्रकार लोणावळ्यात घडल्याचे उघडकीस आले आहे. लोणावळ्यातील नामांकित महाविद्यालयात रॅगिंगमुळे दिव्यांग विद्यार्थिनील ब्रेन स्ट्रोक आल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. तिच्यावर सध्या पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे रॅगिंग सुरू असून याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली होती, मात्र पोलिसांनी तेव्हा काहीच कारवाई केली नाही असा आरोप नातेवाईकांकडून करण्यात येत आहे.
तीन महिन्यांपासून सतत त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित दिव्यांग विद्यार्थिनी ही लोणावळ्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये BBA/CA च्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे. ती तेथीलच एका मुली़च्या हॉस्टेलमध्ये रहात होती. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून तिला प्रचंड त्रास दिला जात होता, तिचं सतत रॅगिंग केलं जातं होतं. तिला बाथरूममध्ये कोंडून ठेवलं जायचं, काही विद्यार्थिनी तिच्या मागे चाकू घेऊनही धावत सुटायच्या. याचा पीडितेला खूप त्रास होत होता, या झटापटीत दोन वेळा तर तिला चाकीही लागला, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.
धक्कादायक गोष्ट म्हणजे याआधी हे प्रकार घडल्यानंतर पीडित विद्यार्थिनी आणि तिच्या पालकांनी याप्रकरणी हॉस्टेलच्या वॉर्डनकडे तक्रार केली होती. मात्र काहीच फरक पडला नाही. हे प्रकार सुरूच होते, अखेर तिच्या पालकांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तिथेही तक्रार दाखल केली. मात्र त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही.
सतत हे रॅगिंग सुरू होते, ते पीडितेला सहन झाले नाही आणि त्यामुळेच तिला ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला. तिच्यावर पिंपरी- चिंचवडमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ती तिथे आपल्या जीवनासाठी लढा देत आहेत. या एकंदर प्रकारामुळे मुलीचे पालक आणि नातेवाीक प्रचंड संतापले आहेत. रॅगिंग करणाऱ्या मुलींवर वेळीच कारवाई केली असती तर आमच्या मुलीवर ही वेळ आली नसती, अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. ज्या मुलींनी रॅगिंग केलं त्यांच्यावर आता तरी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.