भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यामुळे 21 वर्षाच्या निष्पाप श्रुष्टि चा मृत्यू
कोल्हापूर : शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा मागणी होऊनही, त्याचा फारसा परिणाम महापालिका प्रशासनावर होत नसल्याचे दिसून येते. मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याने उपचार घेत असलेल्या एका निष्पाप तरुणीला जीव गमवावा लागला. श्रृष्टी सुनील शिंदे (वय २१, रा. विशाळगडकर कंपाउंडजवळ, नागाळा पार्क) असे तिचे नाव आहे. ती ग्राफिक डिझानयर होती.
येथील भाऊसिंगजी रोडवर तीन फेब्रुवारीला कुत्र्याने सुमारे पंधरा ते वीस जणांचा चावा घेतला होता. त्यापैकी श्रृष्टी एक होती. तिचा करुण अंत पाहणाऱ्या कुटुंबीयांनी सीपीआरमधील उपचार पद्धतीवर आणि महापालिका प्रशासन कुत्र्यांचा बंदोबस्त करू शकत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिच्या मागे वडील, आई, बहीण असा परिवार आहे.
भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडल्याची समस्या शहरात गंभीर झालेली असतानाच तीन फेब्रुवारीला भटक्या कुत्र्याने अनेकांचा चावा घेतला. याच दिवशी दुपारी श्रृष्टी कामानिमित्त शनिवार पेठेत जात होती. फोन आला म्हणून ती डॉ. गुणे यांच्या हॉस्पिटलशेजारी मोबाईलवर बोलत थांबली होती. याचवेळी भटक्या कुत्र्याने तिच्या डाव्या पायाचा चावा घेऊन लचका तोडला.
गंभीर जखमी श्रृष्टीला स्थानिकांनीच तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार झाले. जखम गंभीर असल्यामुळे टाके घातले होते. तेथील उपचार घेतल्यानंतर ती घरी गेली. तिच्यावर वैद्यकीय नियमानुसार रेबीज प्रतिबंधक लसीने उपचार झाले. तिने तीन डोस पूर्ण केले. शुक्रवारी तिचा शेवटचा डोस झाल्याचे तिच्या नातेवाइकांनी सांगितले.
दरम्यान, शनिवारी श्रृष्टीला ताप आला. अचानकच दोन्ही पायातील ताकद कमी झाली. तातडीने फॅमिली डॉक्टरांना दाखविले. त्यांच्या सल्ल्याने तिला तातडीने सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेथे श्रृष्टीला 'जेबी सिंड्रोम' झाल्याचे निष्पन्न झाले. तेथे उपचार सुरू झाले. मात्र, प्रकृती अधिक खालवत होती. यावर शंका आल्यामुळे डॉक्टरांनी अधिक चाचण्या केल्या. व्हेंटिलेटरवर ठेवले. चाचण्यांचा अहवाल आला तेव्हा तिला रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले. तेथून तिला सीपीआरमध्ये हलविले. रात्री आठ वाजता तिला सीपीआरमध्ये दाखल केले. मध्यरात्री दोनच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तेथील भयानक स्थिती व्यक्त करताना कुटुंबीयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
मृत्यूला जबाबदार कोण?
शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक वेळा मागणी होऊनही, त्याचा फारसा परिणाम महापालिका प्रशासनावर होत नसल्याचे दिसून येते. प्रत्येक वेळी कायद्यावर बोट ठेवून महापालिका उपाययोजनांसाठी हात वर करते. मात्र, अशा मृत्यूला कोण जबाबदार? त्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई कोण देणार? २१ वर्षांच्या मुलीला जीव गमवावा लागला याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने श्रृष्टीच्या नातेवाइकांनी उपस्थित केले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.