पाकिस्तानातील 1,167 नागरिकांना भारतीय नागरिकत्व; निवडणुकीच्या घोषणेआधी 18 जणांना नागरिकत्व बहाल
केंद्र सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा वटहुकूमन काढल्यानंतर आता देशभरात त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. शनिवारी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेच्या काही मिनिटे आधी गुजरातच्या अहमदाबाद जिह्यात पाकिस्तानातून आलेल्या 18 हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले.
गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्श संघवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या शिबीरात 18 जणांना नागरिकत्व देण्यात आले. दरम्यान, आतापर्यंत पाकिस्तानातील 1 हजार 167 नागरिकांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार 2016 आणि 2018 च्या राजपत्रातील अधिसूचनेनुसार गुजरातमधील अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील अल्पसंख्याक समुदायातील लोकांना भारतीय नागरिकत्व देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत.
या अधिकाराचा वापर करून आतापर्यंत अहमदाबाद जिह्यात पाकिस्तानातून आलेल्या 1,167 हिंदू निर्वासितांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे. दरम्यान, गृहमंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 31 हजार अल्पसंख्याक निर्वासितांना सीएए कायद्याचा लाभ होणार आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.