ऍम्ब्युलन्सला रस्ता न दिल्याबद्धल 10 हजाराचा दंड
रुग्णवाहिकेला वाट देणे सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे. मात्र, यानंतरही काही लोक अनेकदा रुग्णवाहिकेला जाण्यासाठी रस्ता देताना दिसून येत नाहीत. हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये एका कार चालकाने रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही. यानंतर पोलिसांनी कार चालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, हिमाचल प्रदेशातील बिलासपूर येथील बरठीं मुख्य चौकातून रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने पोलिसांनी कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. रुग्णवाहिकेचा सायरन ऐकून चौकात ड्युटीवर तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याने कार चालकाला कार हटवण्यास सांगितले, मात्र त्याने ती हटवली नाही. यानंतर कार मालकाला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकीकडे कार चालक रुग्णवाहिकेला रस्ता देत नव्हता. त्यामुळे घटनास्थळी उपस्थित काही लोकांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ सुरू केली. तसेच, समजावूनही त्यांनी ऐकले नाही. यादरम्यान, रुग्णवाहिकेत असलेला रुग्ण 15 मिनीटे वेदनेने ओरडत राहिला. मात्र, त्यानंतरही कार चालकाने काहीही ऐकून घेतले नाही. तलाई पोलीस ठाण्याच्या प्रभारी अमिता यांनी सांगितले की, रस्त्यावर कार पार्क करणे आणि रुग्णवाहिकेला रस्ता न दिल्याने कार चालकाला दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, 2019 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने मोटार वाहन (दुरुस्ती) विधेयक मंजूर केले होते, ज्या अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली होती. मोटार वाहन कायद्याच्या कलम 196 ई अंतर्गत, रुग्णवाहिकेचा मार्ग रोखणाऱ्या कोणत्याही वाहनावर 10 हजार रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली होती, जी पूर्वी 100 रुपये होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.