व्यक्तीने विमानाचे केले व्हिलामध्ये रूपांतर; पहा Video
एखादी गोष्ट मनापासून करायची ठरवली की, ती पूर्ण करण्याचे मार्ग आपोआप दिसू लागतात. प्रत्येकाची एक बकेट लिस्ट म्हणजेच स्वप्नांची किंवा इच्छांची यादी तयार असते. त्यात तुम्हाला आयुष्यात कोणत्या गोष्टी करायच्या आहेत हे आधीच ठरलेले असते. परंतु, या गोष्टी पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत आणि संयम महत्त्वाचा असतो. तर, आज सोशल मीडियावर याचे एक उत्तम उदाहरण पाहावयास मिळालं आहे. एका व्यक्तीने त्याचे स्वप्न पूर्ण करीत बोईंग ७३७ चे खासगी जेट व्हिलामध्ये रूपांतर केले आहे; जे पाहून प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्राही प्रभावित झाले आहेत.
या व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, रशियन उद्योजक फेलिक्स या तरुणाने जुन्या बोईंग ७३७ चे खासगी जेट व्हिलामध्ये रूपांतर केले. वर्तुळाकार दरवाजातून, अनेक पायऱ्या चढून या जेट व्हिलामध्ये प्रवेश केला जातो. त्यानंतर या व्हिलामध्ये हॉल (लिव्हिंग एरिया), दोन बेडरूम, स्वयंपाकघर, बाथरूम, छोट्या खिडक्या, स्मार्ट हाऊस आहे. तर सिस्टीमद्वारे तुम्हाला जे हवे आहे ते तुम्ही इथे मागवू शकता. विमानाचा उजवा पंख, समुद्राच्या दृश्याचा आनंद घेण्यासाठी पारदर्शक ॲक्रेलिक भिंत लावून खुर्च्या आणि टेबल यांनी सजविलेला आहे. एकदा तुम्हीसुद्धा पाहा हा जेट व्हिला.
सुप्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ पाहिला आणि रिपोस्ट करीत लिहिले की, काही जण इतके भाग्यवान असतात की, ते त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यास सक्षम असतात आणि हा व्हिडीओ पाहून तरुणाने त्याच्या कल्पनेवर कोणतेही बंधन घातलेले नाही, असे दिसते आहे. मला इथे राहण्यासाठी बुकिंग करण्यात रस आहे की नाही हे शोधण्याचा मी प्रयत्न करीत आहे. कारण- या अनुभवानंतर मला जेट लॅगबद्दल थोडी काळजी वाटते आहे, अशी कॅप्शन आनंद महिंद्रा यांनी या व्हिडीओला दिली आहे.
जेट लॅग म्हणजे काय ?
जेट लॅग म्हणजे विमान प्रवासानंतर येणारा थकवा. दोन वेगवेगळ्या टाईम झोन मध्ये बराच तास प्रवास केल्याने अनेक व्यक्तींना ‘जेट लॅग’चा त्रास होतो. थकवा, चक्कर येणे, अनिवार्य झोप आदी गोष्टींमुळे प्रवासाच्या आनंदावर विरजण पडते आणि जेट लॅगचा आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसतो. तर, सोशल मीडियावर हा व्हिडीओ आनंद महिंद्रा यांच्या अधिकृत @anandmahindra या एक्स (ट्विटर) अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आनंद महिंद्रा यांना हा व्हिला विकत घेण्यास सांगताना कमेंट्समध्ये दिसून आले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.