भर सामन्यात खेळाडूवर कोसळली वीज.. Video पहा
क्रिडा विश्वासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका फुटबॉल सामन्यादरम्यान एका खेळाडूवर वीज पडली आहे. ज्यामुळे एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे. इंडोनेशियातील एका सामन्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. खेळाडूला तात्काळ रुग्णालयात हलवलं जात होतं, मात्र रुग्णालयात नेत असतानाच खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू झाला.
इंडोनेशियातील एफसी बांडुंग आणि एफबीआय शुबांग यांच्यात मैत्रीपूर्ण सामना खेळला गेला. हा सामना शनिवारी इंडोनेशियातील पश्चिम जावा येथील सिलीवांगी स्टेडियमवर खेळला गेला. दरम्यान, सामना खेळणाऱ्या एका खेळाडूवर वीज पडली आणि यामध्ये खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला.
हवामान खराब असतानाही खेळवण्यात आला सामना
सामन्या दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सामन्यादरम्यान खेळाडूंनी आपल्या खेळावर लक्ष केंद्रीत केल्याचं स्पष्टपणे दिसून येतं. हा सामना खराब हवामानात खेळला जात होता. दरम्यान, मैदानाच्या एका बाजूला उभ्या असलेल्या खेळाडूवर अचानक वीज पडली. व्हिडीओमध्ये विजांच्या कडकडाटादरम्यान भीषण आग बाहेर पडताना दिसतेय. विजेचा धक्का लागलेला खेळाडू लगेच मैदानावर कोसळल्याचंही व्हिडीओमध्ये दिसत आहे.
तात्काळ रुग्णालयात हलवलं, पण तोपर्यंत आयुष्याचा दोर तुटलेला
सामना सुरू असतानाच मैदानात वीज कोसळली. स्फोट झाला. स्फोटाचा आवाज इतका भीषण होता की, ज्या खेळाडूवर वीज कोसळली त्याच्या बाजूला उभा असलेला दुसरा खेळाडूही जमिनीवर कोसळतो. पण सुदैवानं त्या दुसऱ्या खेळाडूला काहीशी दुखापत झाली नाही. वीज कोसळल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी मैदानात उपस्थित असलेले इतर खेळाडूही जमिनीवर झोपले, तर काहीजण मैदानाबाहेर पळून गेले. ज्या खेळाडूवर वीज कोसळली, तो खेळाडू उठूच शकला नाही. क्षणार्धात मैदानात उपस्थित असलेल्या खेळाडूंसह सपोर्ट स्टाफनं त्याच्याकडे धाव घेतली. डॉक्टर्सही मैदानात आले. खेलाडूला लगेचच स्ट्रेचरवर आणलं. या दरम्यान खेळाडूचा श्वास सुरू होता. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला. त्याच्या आयुष्याचा दोर तुटला आणि वाटेतच त्याचा दुर्दैवी अंत झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
वर्षभरात वीज पडण्याची दुसरी घटना
गेल्या 12 महिन्यांत इंडोनेशियन फुटबॉलपटूला विजेचा धक्का बसण्याची ही दुसरी वेळ आहे. 2023 च्या सोराटिन अंडर-13 चषकादरम्यान बोजोंगोरो, पूर्व जावा येथे एका फुटबॉलपटूला विजेचा धक्का बसला. त्यानंतर मैदानावर उपस्थित असलेल्या इतर 6 खेळाडूंनाही विजेचा धक्का बसला. मात्र, त्यावेळी डॉक्टरांनी सर्वांचे प्राण वाचवले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.