मुंबईला येणाऱ्या ट्रेनची JCBला धडक, जेसीबीचा चक्काचूर; VIDEO आला समोर
वाराणसी : वाराणसीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेस ट्रेनची जेसीबीला जोरदार धडक बसली. या धडकेत जेसीबीचा चक्काचूर झाला तर ट्रेनच्या इंजिनचं नुकसान झालं. जेसीबी मशिन ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला नेण्यात येत होतं.
तेव्हा ट्रेनची जोराची धडक बसली. या अपघातात जेसीबीचा चालक गंभीर जखमी झाला आहे. रेल्वे ट्रॅकवर कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही दुर्घटना घडल्याचं म्हटलं जातंय. वाराणसीहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनची धडक इतकी भीषण होती की जेसीबीचे तुकडे झाले. जेसीबी चालक उडून दूर अंतरावर पडला. यावेळी मोठा आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ झाला.
अपघातानंतर रेल्वेतून काही प्रवाशांनी उड्यासुद्धा मारल्या. डीडीयू टर्मिनलच्या व्यासनगर रेल्वे फाटकाजवळ रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास झाला. रेल्वे फाटकाजवळ जेसीबीने काम सुरू होते. जेसीबी रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असतानाच ट्रेनची धडक बसली.
घटना घडली तेव्हा ट्रेनचा वेग कमी होता. त्यामुळे मोठा अपघात झाला नाही. रेल्वे रुळावरून घसरली नाही. पण रेल्वेची जेसीबीला धडक बसल्याचं समजताच रेल्वे प्रशासनात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जेसीबी ट्रॅकवरून हटवला. जेसीबीच्या मदतीने ट्रॅकच्या शेजारी असलेली झुडपे काढण्याचं काम सुरू होतं. त्यासाठी ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला नेला जात असताना हा अपघात घडला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.