अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसच्या हायकमांडचे निर्देश; 'या' व्यक्तीवर पक्षाला शाश्वती नाही
आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या बऱ्याच राजकीय घडामोडींना वेग आला असून, त्यात भर पडली ती एका मोठ्या घटनेनं. ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर मोठा राजकीय भूकंप आला. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमध्ये राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे. हायकमांडनं प्रदेश काँग्रेसला बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी संध्याकाळी साडे सात वाजता मुंबईत प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चव्हाणांसोबत आणखी किती नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत याचा वेध या बैठकीत घेण्यात येईल. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधून आणखी काही मोठी नावं पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशा चर्चांनी जोर धरला होता. ज्यामुळं आता पक्षश्रेष्ठीसुद्धा यामध्ये जातीनं लक्ष घालताना दिसत आहेत.
राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडे किती आमदारांचं संख्याबळ आहे यावरही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. पक्षातील 45 आमदारांमधून आता चव्हाणांनी राजीनामा दिला. तिथं सुनील केदार हे बँक घोटाळ्यात दोषी आढळल्यानं त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे. तर, काही दिवसांपूर्वीत बाबा सिद्दिकी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात गेल्यामुळे त्यांचे सुपुत्र, झिशान सिद्दिकीबाबत काँग्रेसला शाश्वती नाही, झिशान सिद्दीकी हेसुद्धा युवा फळीतील महत्त्वाचं नाव असल्यामुळं सध्या त्यांच्या नावाचीही बरीच चर्चा सुरु आहे. या सर्व विषयांवर पक्षाच्या बैठकीत चर्चा होणार आहेत.
चव्हाण धरणार भाजपची वाट?
दरम्यान, राजीनामा दिल्यानंतर आपण दोन दिवसांत राजकीय दिशा स्पष्ट करू, असं अशोक चव्हाणांनी सांगितलं होतं. पण, सूत्रांच्या माहितीनुसार मात्र ते मंगळवारी 13 फेब्रुवारी रोजीच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. दुपारी साडेबारा वाजता देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद आहे. याच पत्रकार परिषदेत अशोक चव्हाण भाजपामध्ये प्रवेश करतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. तेव्हा येत्या काही तासांतच आणखी एक राजकीय भूकंप येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.