Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यापासून वेतन नाही, सांगली आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नऊ महिन्यापासून वेतन नाही, सांगली आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ४०हून अधिक कंत्राटी कामगारांना नऊ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. एका खासगी कंपनीकडून जिल्ह्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांत कंत्राटी स्वरूपात त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कर्मचाऱ्यांचे वेतन सुमारे नऊ महिन्यांपासून जमा झालेले नाही. त्यामुळे त्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. वाहनचालक, आरोग्य सहायक, औषध निर्माण अधिकारी अशा विविध संवर्गांतील सुमारे ४० कंत्राटी कर्मचारी वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत. मे २०२३ पासूनचे वेतन संबंधित कंपनीने जमा केलेले नाही. पैसेच नसल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. वेतनासाठी जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करत आहेत. प्रशासनाकडून कंपनीकडे वेतन जमा करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

सहा ते सात महिन्यांपासून शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधीच आला नव्हता. त्यामुळे वेतन थांबले होते. वेतनासाठी दोन कोटींची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यापैकी सुमारे ९२ लाख रुपये काही दिवसांपूर्वी कोषागार कार्यालयात जमा झाले आहेत. त्यामुळे नोव्हेंबरपर्यंतचे वेतन पाच-सहा दिवसांत जमा होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक पाटील यांनी सांगितले की, खासगी कंपनीकडून या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शासनाकडून निधीच आला नसल्याने वेतन झाले नव्हते. नुकतेच ९२ लाख रुपये जमा झाले आहेत. आठ दिवसांत नोव्हेंबरपर्यंतचे वेतन जमा होईल.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.