Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग 'राम'भरोसे

अयोध्येसाठी विशेष रेल्वे दिली, मात्र तिकिट बुकिंग 'राम'भरोसे

सांगली : अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर लगेचच सांगली जिल्ह्यातील रामभक्तांसाठी रेल्वेने आनंदाची बातमी जाहीर केली आहे. १३ फेब्रुवारीला सांगली स्थानकावरून अयोध्येसाठी विशेष रेल्वे धावणार असल्याचे सांगत वेळापत्रक जाहीर केले.

मात्र, तिकिट बुकिंग सुरूच झाले नसल्याने प्रवाशांच्या पदरी प्रतीक्षा करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. सांगली स्थानकावरून मंगळवार, १३ फेब्रवारी रोजी रात्री ११:४५ वाजता अयोध्या धाम जाणारी विशेष रेल्वे गाडी (क्र.००१४८) सुटणार आहे. त्यानंतर शुक्रवार, १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९:२० वाजता अयोध्येतून गाडी (क्र. ००१४९) सांगली स्थानकावर परत येणार आहे.


ही गाडी जाहीर झाल्यानंतर लगेचच बुकिंग सुरू करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, अद्याप बुकिंगला सुरूवात झालेली नाही. काही प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता, बुकिंगबाबत कोणाला काहीच कल्पना नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तिकिट बुकिंग कधी सुरू होणार, याबाबत शंका उपस्थित होत आहे. बुकिंग सुरू नसल्याने अयोध्येला जाऊ पाहणाऱ्या भाविकांचा खोळंबा झाला आहे. त्यांना नियोजन करतानाही अडचणी येत आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडे बुकिंग सुरू करण्याबाबत मागणी करण्यात आली आहे.

नागरिक जागृती मंचकडून मागणी

मागील महिन्यात सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचचे अध्यक्ष सतीश साखळकर यांनी मध्य रेल्वेकडे श्रीरामाच्या दर्शनासाठी सांगलीतून अयोध्येला गाडी सुरू करण्याची मागणी केली होती. ती मागणी मान्य करत मध्य रेल्वेने भाविकांसाठी विशेष रेल्वे दिली होती.


अशी धावणार आहे विशेष गाडी

सांगली स्थानकावरून सुटून ही गाडी सातारा, पुणे, दौंड, अहमदनगर, कोपरगाव, अंकाई, मनमाड, भुसावळ, इटारसी, भोपाळ, बीना, झांसी, ओराई, कानपूर, फतेहपूर, प्रयागराज येथे थांबून गुरूवारी १५ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता अयोध्या धाम पोहोचेल.

या विशेष गाडीचे आरक्षित तिकिट बुकिंग तातडीने सुरू करावे. प्रवासाचे नियोजन करणे त्यामुळे सोयीचे होते. केवळ गाडी जाहीर करून उपयोग नाही. बुकिंग सुरू का केले नाही, याबाबत आम्ही रेल्वे प्रशासनाला विचारणा करू.- सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.