एकच मिशन, मराठा आरक्षण चिठ्ठी लिहून तरुणाने संपविले जीवन
फुलंब्री: एकच मिशन, मराठा आरक्षण..., मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्याने मी ही टोकाची भूमिका घेत आहे.. अशी चिठ्ठी लिहून तालुक्यातील गणोरी येथील अठरा वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.१७) रोजी उघडकीस आली आहे. गजानन नारायण जाधव (वय-18, रा. गनोरी, ता. फुलंब्री, जि. छत्रपती संभाजीनगर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेले तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्री तालुक्यातील गणोरी येथील गजानन नारायण जाधव हा अठरा वर्षे तरुण इयत्ता बारावीच्या वर्गात तालुक्यातील निधोना येथील प्रभात हायस्कूल विद्यालयात शिकत होता. घरचे हालाकीची परिस्थिती असल्यामुळे आपण शिक्षण घेऊन वडिलांच्या नावावर असलेले कर्ज खेळण्याचा मानस त्याचा होता.
मात्र मागील गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या आरक्षणात सरकारी ठोस भूमिका घेत नसल्याने आपल्याला आरक्षण नाही आणि मग आता नोकरी कशी मिळणार..? याची चिंता त्याला सतावत होती. तसेच वडील नारायण जाधव यांच्या नावावर बॅंक ऑफ बडोदा गणोरी शाखेचे 95 हजार, एचडीएफसी बॅंकेचे 1 लाख 20 हजार व इतर खाजगी काही कर्ज असल्यामुळे तणाव त्याच्यावर दिवसेंदिवस वाढत होता.
त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण नाही, त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना नोकऱ्याही मिळणार नाही. यावर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने उत्पन्न हाती आले नाही. त्यामुळे गजानन नारायण जाधव याने गणोरी येथे गट नंबर 191 येथील शेतात जनावरांच्या गोठ्यात जनावरे बांधतात त्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान त्याचा लहान भाऊ कार्तिक जाधव याने पाहिल्यानंतर त्याने आरडाओरड केली.त्यानंतर सदरची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलिस आल्यानंतर त्यांनी झडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये आत्महत्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत एकच मिशन, मराठा आरक्षण... मराठा आरक्षण न मिळाल्यामुळे मी ही टोकाची भूमिका घेत आहे.. असे लिहिलेले आढळले. पोलिसांनी सदरील चिठ्ठी जप्त केली असून रुग्णवाहिकेद्वारे फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात गजानन जाधव याला दाखल केले.
मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. शनिवारी दुपारी गजानन जाधव यांच्यावर शवविच्छेदन करण्यात आले. शोकाकुल वातावरणात गणोरी येथे गजानन जाधव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात वडील, आई, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. फुलंब्री पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. राठोड हे करत आहे.
आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करा
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने फुलंब्री तालुक्यात सातत्याने एकापाठोपाठ एक आत्महत्या होऊ लागल्या आहे. आरक्षण नसले तर नोकरी मिळत नसल्याच्या नैराशातून सदरील आत्महत्या घडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. शासनाने मराठा आरक्षणासाठी होत असलेल्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.