अभिषेक घोसाळकर यांची हत्या पूर्वनियोजित कट!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येप्रकरणी मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला न्यायालयाने 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. अभिषेक घोसाळकर यांची हत्या पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय आहे. त्या अनुषंगाने अधिक तपास करायचा आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
अमरेंद्र मिश्राला गुरुवारी रात्री अटक केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला महानगर दंडाधिकारी न्यायालयापुढे हजर करण्यात आले. मिश्राचा पूर्वनियोजित कटात सहभाग असल्याचा संशय आहे. त्या दृष्टीने त्याची अधिक चौकशी करणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केला. यावेळी बचाव पक्षाने मिश्राचा कथित गुह्यात सहभाग नसून त्याला नाहक गोवण्यात आल्याचा दावा केला. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने मिश्राला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
अभिषेक यांची हत्या मॉरिसने ज्या पिस्तुलातून गोळय़ा झाडून केली ते पिस्तूल मॉरिसचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्राचे होते. त्या पिस्तुलाचा यूपीतला परवाना मिश्राकडे होता. त्यामुळे ते पिस्तूल मिश्राच्या ताब्यात असणे गरजेचे होते. पण त्याच्या पिस्तुलातून मॉरिसने गोळीबार करत अभिषेक यांची हत्या केली. त्यामुळे या प्रकरणात मिश्राचा हलगर्जीपणा स्पष्ट झाल्याने गुन्हे शाखेने त्याला अटक केली.
मिश्राने त्याच्याकडील पिस्तुलाची नोंद मुंबई पोलिसांकडे केली होती का? मॉरिसशी त्याची ओळख कोणी करून दिली होती? कामावरून घरी जाताना पिस्तूल मॉरिसच्या कार्यालयात ठेवण्यासाठी मॉरिसने त्याला सांगितले होते का ? मॉरिसने पिस्तूल चालवायचे प्रशिक्षण घेतले होते का? मॉरिस हा अभिषेक यांचे बरेवाईट करणार याची अमरेंद्र याला कल्पना होती का? याबाबत पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.