Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मंत्रालयाच्या आवारात रिल्सवर बंदी; फोटोसेशन करणाऱ्यांवरही वॉच

मंत्रालयाच्या आवारात रिल्सवर बंदी; फोटोसेशन करणाऱ्यांवरही वॉच

जामिनावर सुटलेला पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळचे मंत्रालयात तयार केलेले रिल समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदम सावध पवित्रा घेतला आहे. अशा रिल्समुळे सरकार अडचणीत येत असल्यामुळे मंत्रालयात रिल्स तयार करण्यावर पोलिसांनी तातडीने बंदी आणली आहे. मंत्रालयाच्या इमारतीत फोटो काढणाऱयांवरही पोलिसांनी वॉच ठेवला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणाऱया गुडांचे फोटो दररोज ट्विट करण्यास शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धाबे दणाणले आहे.

मंत्रालयात साथीदारांसोबत फिरतानाचे गुंड नीलेश घायवळने रिल तयार केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुंड नीलेश घायवळचे रिल्स माध्यमांसमोर आणले होते. राज्यातील शिंदे-फडणवीस यांचे महायुतीचे सरकार गुंडांना अभय देत असून सरकारच्या मेहेरबानीने गुंड मंत्रालयात बिनधास्त फिरतात. मंत्रालयात रिल्स तयार करतात. गुंडांना राजाश्रय मिळत असल्याची सरकारवर टीका सुरू झाली आहे. 


त्यामुळे मंत्रालयाच्या आवारात कोणालाही रिल्स तयार करू देऊ नका अशा तोंडी सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांनी मंत्रालयात बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना दिल्या आहेत. मंत्रालयात आल्यावर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या दालनासमोर फोटो आणि सेल्फी काढण्याकडे अनेकांचा कल असतो. पोलीस आता अशा हौशी कार्यकर्त्यांवरही लक्ष ठेवणार आहेत. मंत्रालयाच्या इमारतीमधील त्रिमूर्ती चौकात आणि या चौकातील वाघाच्या पुतळय़ाजवळ अनेक जण फोटो काढत असतात. या सर्वांवर पोलिसांचा आता वॉच असणार आहे.

मंत्रालयात तयार केलेले गुंडाचे रिल गाजत असताना आज एका आमदाराचे रिल्स कार्यकर्त्यांनी तयार केले. हे आमदार कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयाच्या बाहेर पडत असताना समोरील कार्यकर्ता मोबाईलमधून चित्रीकरण करीत होता. पण या आमदारांना हटकण्याची बंदोबस्तावरील पोलिसांची हिंमत झाली नाही.


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.