सांगलीत बंगला फोडणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक २९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
सांगली ः सांगली शहरातील कोल्हापूर रस्त्यावरील समर्थ कॉलनी येथील बंद बंगला फोडून २८ लाखांचा ऐवज लंपास करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून दागिने, रोकड, मोपेड असा तब्बल २९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिली.
राजू प्रकाश नागरगोजे (वय ३६, रा. सावंत गल्ली, उचगाव, कोल्हापूर), नितेश आडवय्या चिकमठ (वय २९, रा. सावरकर कॉलनी, विश्रामबाग, सांगली) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. दि. ५ ते ६ फेब्रुवारी दरम्यान सांगलीतील कोल्हापूर रस्ता परिसरातील समर्थ कॉलनी येथील विनोद खत्री मुलीच्या लग्नासाठी कोल्हापूर येथे गेले असता अज्ञातांनी त्यांचा बंगला फोडून २८ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याचा तातडीने तपास करून संशयितांना अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी एलसीबीचे निरीक्षक श्री. शिंदे यांना दिल्या होत्या. यासाठी शिंदे यांनी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे एक विशेष पथक तयार केले होते.
पथक चोरट्यांचा शोध घेत असताना दोघेजण एक निळ्या रंगाची मोपेड घेऊन अंकली फाटा येथे चोरीचे सोने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला खबऱ्याद्वारे मिळाली. त्यानुसार पथकाने अंकली फाटा परिसराती सापळा रचला होता. दोघे संशयित तेथे आल्यानंतर पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील पिशवीची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोकड सापडली. त्याबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी सांगलीतील समर्थ कॉलनी येथील बंद बंगला फोडून तेथून ऐवज चोरल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांना अटक करून त्यांच्याकडून ८.५२ लाखांचे दागिने, २० लाखांची रोकड, एक मोपेड असा २९.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यांना सांगली शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक संदीप घुगे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सचिन धोत्रे, अरूण पाटील, प्रकाश पाटील, सुनील जाधव, रोहन घस्ते, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, स्वप्नील नायकोडे, अजित पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.