बाबासाहेब आंबेडकरांचे नाव हटविणे पडले महागात
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी वाघेरे विभागात 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालय' हे रुग्णालयाचे नाव हटवून केंद्र सरकारच्या योजनेचा फलक लावण्यात आला होता.
याप्रकरणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी महापालिका प्रशासना विरोधात राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे तक्रार केली होती. या प्रकरणाची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना नोटीस बजावली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की,काही दिवसांपूर्वी महापालिकेकडून पिंपरी वाघेरे येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयाच्या संपूर्ण इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली. यावेळी या इमारतीला असणारे बाबासाहेबांचे नावालाही पुसण्यात आले. हे पूर्ण काम झाल्यानंतर याठिकाणी 'आयुष्मान आरोग्य मंदीर' असा फलक लावण्यात आला आहे. यासंदर्भात दिपक खैरनार यांनी विचारणा केली असता, अधिकार्यांनी उडवा-उडवीची उत्तरे देत टाळाटाळ केली. त्यामुळे खैरनार तक्रार केली.
तक्रारीत म्हटले आहे की, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय हा राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणार्या विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे कर्तृत्व खुप मोठे आहे. या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा रुग्णालयाला बाबासाहेबांचे नाव देणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता त्या ठिकाणी मनपा प्रशासनाकडून केंद्र शासनाच्या 'आयुष्मान आरोग्य मंदीर' अशा आशयाचा फलक लावण्यात आला.
शासनाच्या योजनेस आमचा विरोध नाही परंतु अशा प्रकारे महापुरुषाचे नाव हटविणे अत्यंत चुकीचे आहे.या संपूर्ण प्रकारातून अधिकार्यांचा सामाजिक एकात्मता आणि सामाजिक सलोखा भंग करण्याचा हेतू दिसून येत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
कारवाईचा अहवाल सादर करा
या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने पिंपरी महापालिका आयुक्तांना नोटीस बजावत 'रुग्णालयाला दिलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव बदलल्या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.तसेच करण्यात आलेल्या कारवाईचा अहवाल आयोगाला कळविण्यात यावा, असे निर्देश दिले आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.