जैन मुनी आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे निर्वाण
दिगंबर जैन मुनी परंपरेचे आचार्य श्री विद्यासागर महाराज यांचे शनिवारी रात्री २ वाजून ३५ मिनिटांनी डोंगरगढ चंद्रगिरी (छत्तीसगड) येथे समधीपूर्वक निर्वाण झाले. त्यांच्या समाधीमरणाने संपूर्ण जैन समाजासह त्यांचा भक्तगण शोकसागरात बुडाला आहे.
कर्नाटकमधील सदलगा (ता. चिकोडी, जि. बेळगाव) येथे १० ऑक्टोबर १९४६ ला शरद पौर्णिमेला जन्मलेल्या विद्यासागर यांनी ९ वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर १९६६ ला आचार्य देशभूषण महाराज यांच्याकडून ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते. ३० जून १९६८ रोजी कठोर तपश्चर्या पाहून त्यांना आचार्य ज्ञानसागर महाराज यांनी मुनींदिक्षा दिली. ते २४ वर्षाचे असताना त्यांच्या गुरूंनी त्यांच्याकडे आचार्यपद सोपवले. संपूर्ण जगातील जैन व जैनेत्तर धर्मातील करोडो लोकांचे आस्थास्थान असणाऱ्या आचार्य विद्यासागर यांनी संपूर्ण भारतभर भ्रमण करत सत्य अहिंसा आणि शिक्षणाचा प्रसार केला. विविध ठिकाणी भव्य दिव्य जैन तीर्थक्षेत्र उभारण्याबरोबरच गोशाळा, शैक्षणिक संस्था उभ्या केल्या. ‘मुकमाटी’ या त्यांनी लिहिलेल्या महाकाव्यास अनेक राष्ट्रीय व जागतिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
आयुष्यभर त्यांनी गोड पदार्थांचा त्याग केला होता. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे डोंगरगढ येथे दर्शन घेऊन विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. ६ फेब्रुवारी रोजी त्यांनी निर्यापकश्रमण योगसागर महाराज यांच्याशी चर्चा करून मुनिसंघ कार्यातून निवृत्ती घेत आचार्यपदाचा त्याग केला.
गेली तीन दिवस अखंड मौन धारण करत त्यांनी आहार आणि संघाचा त्याग करत यम सल्लेखना धारण केली. शनिवारी रात्री २ वाजून ३८ मिनिटांनी त्यांना समाधीमरण प्राप्त झाले. रविवारी दुपारी डोंगरगढ येथे त्यांचा देह पंचत्वात विलीन होईल.
‘इंडिया नही भारत बोलो’
संपूर्ण आयुष्यभर आचार्य विद्यासागर महाराज यांनी प्रत्येक प्रवचनातून त्यांनी जनतेला धर्मभक्तीबरोबरच देशभक्तीविषयी जागृत राहण्याचे आवाहन केले. प्रत्येक प्रवचनात त्यांनी ‘इंडिया नही भारत बोलो’चा नारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.