कंपनी कर्मचाऱ्यांना मुले जन्मास घालण्य़ास सांगतेय; वर ६२ लाख देतेय, तीन मुले झाली तर घर...
जगभरात अनेक देश आहेत, त्यांची त्यांची संकटे वेगळी आहेत. एकीकडे चीन, भारत वाढत्या लोकसंख्येशी लढत आहे. तर काही देश असे आहेत ज्यांची लोकसंख्या कमी कमी होत आहे. दक्षिण कोरिया देखील असाच एक देश आहे जो जन्मदर कमी झाल्याने चिंतेत आहे. यामुळे तेथील कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना मुले जन्मास घालण्यासाठी एकापेक्षा एक ऑफर देण्यास सुरुवात केली आहे.
कोरियाची रिअल इस्टेट कंपनी बूयंग ग्रुपने आपल्या कर्मचाऱ्यांना मुले जन्मास घालण्यास सांगितले आहे. २०२१ नंतर जेवढी अपत्ये झाली किंवा होतील त्या प्रत्येक मुलासाठी १०० दशलक्ष वोन म्हणजेच ६२.१२ लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. देशाचा जन्मदर वाढविण्यासाठी कंपनीचा हा प्रयत्न असल्याचे या ग्रुपचे सीईओ ली यांनी म्हटले आहे.
द कोरिया टाईम्सनुसार या वर्षी ७० टक्के कर्मचाऱ्यांना ही ऑफर देण्यात आली आहे. यासाठी कंपनीने ७.०८ दशलक्ष डॉलर्स राखून ठेवले आहेत. तसेच जर सरकारने जमिन उपलब्ध करून दिली तर मुलांना जन्म देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तीन मुले जन्मास घालण्यासाठी प्रेग्नंसी प्रोत्साहन किंवा घर देण्याचा पर्याय देण्यात येईल, असेही या सीईओंनी म्हटले आहे.
२०२२ मध्ये केवळ २.५० लाख मुलांचा जन्म झाला होता. ज्या लोकांना ३ मुले झाली आहेत त्या लोकांना घरे देण्यात येत आहेत. जन्मदर सध्याच्या दराने घसरत राहिला तर देशाला २० वर्षांत राष्ट्रीय अस्तित्वाच्या संकटाचा सामना करावा लागेल, असे ली यांनी म्हटले आहे. मुलांच्या संगोपनाचा आर्थिक भार आणि काम आणि कौटुंबिक जीवन संतुलित करण्यात अडचण ही प्रमुख कारणे जन्मदर घटण्यामागे असल्याचे ली यांनी म्हटले आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.