सावधान! रेल्वे प्रवासात सांभाळा मोबाइल
मुंबई : महामुंबईकरांची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वे आजच्या घडीला चोरांचा अड्डा झाली आहे. दररोज प्रवाशांच्या मुद्देमालांवर चोरटे डल्ला मारत आहेत. गेल्या ९ दिवसांचा आढावा घेता या मुद्देमालांमध्ये सर्वाधिक ३३७ मोबाईल चोरीला गेल्याची नोंद आहे.
त्यापाठोपाठ ५१ जणांच्या बॅगा-पर्स चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणी रेल्वेच्या मध्य, हार्बर व पश्चिम मार्गांवरील लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. रेल्वेने रोज लाखोंच्या संख्येने लोक प्रवास करतात. सकाळ-संध्याकाळच्या सुमारास कामाला जाणारे तसेच विद्यार्थ्यांसह अन्य प्रवाशांची गर्दी असते. याच गर्दीत चोरटे लोकांच्या नजरा चुकवून मुद्देमाल पळवतात.
जामिनावर सुटल्यावर पुन्हा सक्रिय :
रेल्वे डब्याच्या दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्यांच्या हातावर चोर फटका मारतात. अनेकदा रात्री उशिराच्या गाड्यांमध्ये विशेषत: पहिल्या दुसऱ्या डब्यात चोरटे चढतात आणि स्थानकातून रेल्वे सुटताच प्रवाशांच्या हातातील मोबाईल खेचून धावत्या रेल्वेतून उडी मारतात, ही बाब लक्षात घेता प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोहमार्ग पोलिस दिवस-रात्र सक्रिय असतात. प्रवाशांचा मुद्देमाल चोरणाऱ्या अनेक चोरांना लोहमार्ग पोलिस अटक करतात. मात्र, जामिनावर तुरुंगाबाहेर येताच हे चोरटे पुन्हा सक्रिय होतात. वारंवार तेच आरोपी पोलिसांच्या हाती लागतात.
केवळ ३३ गुन्ह्यांची उकल :
गेल्या ९ दिवसांमध्ये विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी केवळ ३३ गुन्ह्यांची तत्काळ उकल करण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आले असून, उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याची माहिती लोहमार्ग पोलिसांनी दिली.
संकटात १५१२ डायल करा :
रेल्वे प्रवासात कुठल्याही प्रकारचे संकट उद्भवल्यास १५१२ हा क्रमांक डायल करावा. मोफत असलेल्या या हेल्पलाईनवर फोन केल्यास पुढच्या स्थानकात लोहमार्ग पोलिस मदतीसाठी धावून येतात.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.