Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

जयश्रीताईंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित

जयश्रीताईंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित


गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई मदन पाटील या अजितदादा गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे. त्याची पहिली पायरी सोमवारी (ता. ६ फेब्रुवारी) सांगलीत घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे थेट जयश्रीताईंच्या घरी पोहोचले. तेथे चहापान घेत त्यांनी काही वेळ जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्यामुळे काँग्रेस नेत्या जयश्रीताई पाटील यांचा अजितदादा गटातील प्रवेश निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या गृहजिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी अजितदादांनी पूर्ण केल्याचे मानले जात आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजितदादांनी राज्यभर दौरे करीत स्वतंत्र गट स्थापन करण्यास सुरुवात केली आहे. सांगली जिल्ह्यातही अजितदादा गटाने पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्यानंतर बड्या नेत्यांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. आतापर्यंत अजितदादांच्या गळाला दिग्गज नेता लागलेला नाही. त्यामुळेच माजी मंत्री (स्व.) मदन पाटील यांच्या पत्नी आणि जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.

मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यावेळी जयश्रीताई पाटील यांनी अजितदादांची भेट घेतली होती. मात्र, त्यांची ही भेट हौसिंग फायनान्सच्या संदर्भातील असल्याचा खुलासा त्यांच्या समर्थकांनी केला होता. मात्र, आठ दिवसांनंतर अजितदादा पवारसांगली दौऱ्यावर आले होते. तेथील काही कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर अजितदादा यांनी थेट जयश्रीताई पाटील यांचे घर गाठले. चहापानानंतर काही काळ त्या ठिकाणी राजकीय चर्चाही झाली.

अजित पवार आणि मदन पाटील हे वेगवेगळ्या पक्षात होते. मात्र, त्यांच्यामध्ये मैत्रीचे चांगले संबंध होते. राजकीय क्षेत्रात काम करत असताना उपमुख्यमंत्री पवार यांनी मदनभाऊंना अनेकवेळा मदत केली होती. मदनभाऊंच्या निधनानंतरही अनेक कार्यकर्ते जयश्रीताईंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.

महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात मदनभाऊ गट सक्रिय आहे. या गटाला बळ देण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा प्रयत्न आहे. आठ दिवसांत दोन्ही नेत्यांची दोनवेळा भेट झाली आहे, यामुळेच जयश्रीताई यांचा अजितदादा गटातील प्रवेश निश्चित मानला जात आहे. मात्र, उपमुख्यमंत्री पवार यांनीही जयश्रीताईंच्या प्रवेशाबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.