Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

येरवडा कारागृहात कैद्याची आत्महत्या

येरवडा कारागृहात कैद्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोेमवारी (दि. १२) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. दरम्यान, आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

येरवडा कारागृहातील गैरप्रकार रोखण्यासाठी कारागृहात ८१२ सीसीटीव्ही कॅमेरे नुकतेच बसविण्यात आले आहेत.मंगेश विठ्ठल भोर (३० ,रा. हिवरे, ता. जुन्नर, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या कैद्याचे नाव आहे. भोर याने जुलै २०२३ मध्ये देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

कारागृह प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मंगेश भोर विरुद्ध ओतूर पोलीस ठाण्यात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. कारागृहातील कैद्यांना नेहमीप्रमाणे सकाळी नाश्ता करण्यासाठी बाहेर सोडण्यात आले. त्या वेळी कारागृहाच्या आवारातील रुग्णालय विभागाच्या मेडिकल स्टोअरच्या बाजूला पडवीत टॉवेलने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला.

कारागृहातील कैद्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर रक्षकांना ही माहिती कळविण्यात आली. कारागृह अधिकार्‍यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला कारागृहातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. १६ जुलै २०२३ पासून मंगेश येरवडा कारागृहात न्यायाधीन बंदी होता.

मंगेश याच्यावर कारागृह मानसोपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली मानसिक आजारावरील उपचार सुरू होते. त्यासाठी त्याला तेथे दाखल करण्यात आले होते. दरम्यान मंगेशच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.