पुणे हादरले! जेलबाहेर आल्यावर आरोपीचं बलात्कार पीडितेसोबत संतापजनक कृत्य
बलात्कारातील पीडितेच्या दुचाकीला जीपीएस लावल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. कारागृहातून परत आल्यानंतर या तरुणाने निर्लज्जपणाचा कळस केला आहे.
याप्रकरणी पुण्यातील विश्रामबाग पोलिसांकडून तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार आणि तरुणीचे लाखो रुपयांचे दागिने घेऊन या तरुणाने फसवणूक केल्याचा आरोप आहे. कारागृहातून जामिनावर बाहेर आल्यानंतर तरुणाने हा प्रताप केला आहे.
लखन भिसे असं या आरोपीचं नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी खासगी कंपनीत काम करते. लखन आणि या तरुणीची मागच्या वर्षी विवाह जुळवणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून लखनने या तरुणीवर बलात्कार केला, तसंच तिच्याकडून 8 लाख रुपयांचे दागिने घेतले. फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने खडक पोलिसांकडे तक्रार दिली, यानंतर तरुणाला अटक करण्यात आली होती.लखन भिसे कारागृहातून जामिनावर बाहेर आला होता आणि त्याने पुन्हा या तरुणीचा पाठलाग सुरू केला आणि तिच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस लावून पाळत ठेवायला सुरूवात केली आणि तिचा चोरून पाठलाग केला. पीडित तरुणीच्या हा प्रकार लक्षात येताच तिने पोलीस स्टेशन गाठलं. पोलिसांनी गाडीवरील जीपीएस यंत्र काढलं आहे. तसंच जीपीएसमधील सिम कार्डचा तपास सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.